उद्धव ठाकरेंना अरविंद केजरीवाल, सिबू सोरेन यांच्यासारखं जमलं नाही ? गुलाबराव म्हणाले ठाकरेंना प्लॅन जमला नाही…
मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटलंय, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता, एकनाथ शिंदे यांना परत बोलवायला पाहिजे होते.
अनिल केऱ्हाळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, जळगाव : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यायला नको होता असे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हंटलंय. गुलाबराव पाटलांचं हे विधान अनेकांच्या भुवया उंचवणारे असले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणत टीका केली आहे. गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष करत शिंदे गटाची बाजू लावून मांडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यातच पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवलं गेल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मात्र, यावेळी टीका करण्याबरोबरच गुलाबराव पाटील यांनी भुवया उंचवणारे विधान केले आहे. त्यात त्यांनी अरविंद केजरीवाल आणि शिबू सोरेन यांचाही संदर्भ दिला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटलंय, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता, एकनाथ शिंदे यांना परत बोलवायला पाहिजे होते.
पण त्यांनी आमदारांना बोलावलं, त्यांना बोलवण्यापेक्षा एकनाथ शिंदेंना बोलवायला पाहिजे होते. मात्र उद्धव ठाकरेंनी ते केले नाही.
उद्धव ठाकरेंना प्लॅन करता आले नाही, त्यात मुलाला बोलायला आमच्या अंगावर सोडलं ते राजकारणी होऊच शकत नाही असेही पाटील म्हणाले.
दरम्यान अरविंद केजरीवाल, सिबू सोरेन यांच्या बाबतीत पण प्रॉब्लेम झाला होता, त्यांचेही आमदार गेले होते पण त्यांनी आमदारांना परत आणलं.
मंत्री, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नाराज होतात, त्यांची समजूत काढायची असते, नेत्यांचं काम असतं समजावण्याचे पण त्यांना ते जमलं नाही.
एकूणच मंत्री गुलाबराव पाटील यांचे हे विधान अनेकांच्या भुवया उंचवणारे असून शिंदे गटाच्या आमदाराने हे विधान केल्याने त्याची चर्चा होऊ लागली आहे.