महावितरणच्या भरतीत वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा
महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाच्या दोन वर्षांच्या वीजतंत्री, तारतंत्री या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा महावितरण कंपनीच्या 'विद्युत सहाय्यक' या पदाच्या भरतीसाठी अर्हता म्हणून करण्यात आला आहे. महावितरणच्या या निर्णयाबद्दल कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महावितरण कंपनीचे आभार मानले आहेत.
मुंबई | 1 जानेवारी 2024 : व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमांचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEB) यांच्या ‘विद्युत सहाय्यक’ या पदाच्या भरतीसाठीच्या जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हतेमध्ये करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमचा समावेश नोकर भरतीमध्ये केल्याने राज्यातील विविध कौशल्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना मिळणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्राकरीता कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंडळामार्फत विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यातील विविध संस्थांमार्फत राबविण्यात येत असतात.
महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाच्या ( MSBSVET ) पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या ( MSBVE ) 2 वर्ष कालावधीच्या वीजतंत्री ( Electrician ) आणि तारतंत्री ( Wireman ) प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ( MSEB ) यांच्या 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्रमांक 06/2023 च्या ‘विद्युत सहाय्यक’ या पदाच्या भरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतामध्ये करण्यात आला आहे.
कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल
विविध उद्योगांसाठीचे कुशल मनुष्यबळ तयार करण्यास मंडळ सुसज्ज आहे. मंडळाच्या अभ्यासक्रमांचा नोकर भरतीसाठी समावेश केल्याने आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.चे (MSEB) आभारी आहोत, राज्यातील सर्व विभागांनी देखील त्यांच्या पदभरतीमध्ये मंडळाच्या विविध अभ्यासक्रमांचा समावेश करावा, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रातील विभागांना केले आहे. मंडळाच्या कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचा नोकर भरतीसाठी समावेश केल्यास व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण, नवीन कौशल्य, री-स्किलिंग, अप-स्किलिंग आणि रोजगार याद्वारे कौशल्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असा विश्वास मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.