मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : “मासे खा. डोळे सुंदर होतात. मग मुलीही पटतात. ऐश्वर्या रायचे डोळे मासे खाल्ल्यामुळं सुंदर आहेत”, असं वक्तव्य राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर प्रचंड टीका केली जातेय. मासे खा, चेहरा चिकना होईल… कुणीही पटवून घेईल, असं त्यांचं वक्तव्य योग्य नसल्याचं मत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडलं आहे. विशेष म्हणजे विजयकुमार गावित हे डॉक्टर आणि माजी वैद्यकीय शिक्षणमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीदेखील विजयकुमार गावित यांना घरचा आहेर दिला आहे. आपल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाल्यानंतर विजयकुमार गावित यांच्याकडून वक्तव्यावर खुलासा करण्यात आला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा गावित यांनी केलाय. ऐश्वर्या राय ही माझ्या मुलीसारखी आहे, असंही गावित म्हणाले आहेत. फिश ऑईलचे फायदे आदिवासी लोकांना समजावून सांगत होतो. आरोग्यासाठी मासे चांगले असल्याचं मी म्हणालो, असंही गावित म्हणाले.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील विजयकुमार गावित यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. “मी त्यांच्याशी सविस्तर बोलले. त्यांनी मला सांगितले की, माझ्या आदिवासी विभागात कार्यक्रम होता आणि आदिवासी तरूणांनी मासेमारी करावी यासाठी ते होतं”, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
“पण लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. मासे खाल्ल्याने काय फायदे होतात हे ते सांगत होते. पण विपर्यास केला गेला. पण कोणीही असो बोलताना तारतम्य बाळगलंच पाहिजे. आदिवासी तरूणांनी मत्स्य व्यवसायात यायला हवं म्हणून ते बोलले होते”, असं स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी केलं.
“कोणीही नेता असला तरी तारतम्य बाळगलं पाहिजे. तोलुन मालुन गोष्टी बोलल्या पाहिजेत. बोलण्यातून त्यांनी ऐश्वर्या रराय यांचं उदाहरण दिलं. तरी सुद्धा अशी वक्तव्य करताना तारतम्य बाळगलं पाहिजे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.