लॉकडाऊनमुळे शाळा बंद असूनही 79% फी मागणाऱ्या अल्फोन्सा स्कूलच्या मुख्याध्यापकांना पालकांनी धरले धारेवर
कोरोना महामारीच्या कारणास्तव देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे 8-10 महिने राज्यातील शाळा बंद होत्या.
सांगली : कोरोना महामारीच्या कारणास्तव देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे 8-10 महिने राज्यातील शाळा बंद होत्या. तरीदेखील मिरज येथील अल्फोन्सा स्कूलने विद्यार्थ्यांना 79 टक्के शुल्क (Fees) भरण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान शाळेच्या या आदेशानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पालकांनी थेट शाळेच्या मुख्याध्यापकांना धारेवर धरले आहे. यावेळी पालकांनी मुख्याध्यापकांकडे 75 टक्के शुल्क माफ करावे, अशी मागणी केली आहे. (Miraj Alphonsa school principals demanded 79% fees despite school closures during Corona Lockdown)
मिरजेतील अल्फोन्सा स्कूलविरोधात पालक आक्रमक झाले असून शाळेच्या आवारात पालकांनी एकत्र जमून शाळेच्या मुख्याध्यापकांना घेराव घातला. लॉकडाऊन काळात शाळा बंद असूनही अल्फोन्सा स्कूलने लॉकडाऊन काळात विद्यार्थ्याचे ऑनलाईन वर्ग घेतले. त्यामुळे पालकांनी 79 टक्के शुल्क भरावे म्हणून शाळेने विद्यार्थ्यांकडे तगादा लावला आहे. परिणामी आक्रमक झालेल्या पालकांनी थेट शाळेत जाऊन शाळेच्या मुख्याध्यापकांना धारेवर धरत फी कमी करण्याची मागणी केली आहे.
लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळाले नाही. तर केवळ ऑनलाईन वर्ग घेतल्याने शाळेचा खर्चच झालेला नाही. तसेच कोरोना काळात पालक आर्थिक अडचणीत असताना शाळेकडून 79 टक्के फी ची मागणी होणं चुकीचं आहे. त्यामुळे शाळेने 5 वी ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची 75 टक्के फी माफ करावी. तर पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी माफ करावी, अशी मागणी यावेळी पालकांनी केली आहे. पालकांनी या मागणीचे निवेदन मुख्याध्यापक दिलीप सेबेस्टिन यांच्याकडे दिले आहे.
दरम्यान, मुख्याध्यापक दिलीप सेबेस्टिन म्हणाले की, लॉकडाऊन काळातही शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले आहे, शाळेचा खर्च झाला आहे. तरीदेखील आम्ही विद्यार्थ्यांची 21% फी माफ केली आहे. पालकांचे जे काही म्हणणे आहे ते शाळेच्या व्यवस्थापकांकडे पाठवण्यात आले आहे. शाळेचे व्यवस्थापक याबाबत निर्णय घेतील.
शाळेतील शिक्षक विजय धुमाळ म्हणाले की, आम्हालाही घरखर्च आणि मुलांचा खर्च आहे. आम्ही लॉकडाऊन काळात मुलाना ऑनलाईन शिक्षण दिलं आहे, त्यामुळे आम्हाला पगार मिळावा यासाठी पालकांनी शाळेची फी भरून सहकार्य करावे.
हेही वाचा
Maharashtra Lockdown Extended | राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय
(Miraj Alphonsa school principals demanded 75% fees despite school closures during Corona Lockdown)