अर्थसंकल्पात संताची नावं कशासाठी घेतली? अमोल मिटकरी यांची शिंदे-फडणवीस सरकारवर जहरी टीका
राज्याचा अर्थसंकल्प आज शिंदे - फडणवीस सरकारकडून मांडण्यात आला आहे. यामध्ये पाहिल्यांदाच पंचामृत ध्येय धोरणांवर हा अर्थसंकल्प सादर झाला असून विरोधकांनी त्यावर सडकून टीका केली आहे.
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. विशेष म्हणजे यावेळेला अर्थसंकल्प ( Budget Session ) सादर करत असतांना संतांची नावे घेण्यात आली, पण त्यांच्यासाठी कुठलाही निधी दिला नाही. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस जवळ आला आहे. त्याबद्दल एक चकार शब्दही काढला नाही म्हणत आमदार अमोल मिटकरी जहरी टीका केली आहे. याशिवाय आभासी हा अर्थसंकल्प होता. फक्त घोषणा केल्या असून उद्धव ठाकरे यांनी जसं म्हंटलं आहे गाजर हलवा अर्थसंकल्प आहे तसा हा आजचा अर्थसंकल्प असल्याची टीका मिटकरी यांनी केली आहे.
शिंदे – फडणवीस सरकारकडून अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला त्यावरून विरोधी पक्षाकडून सडकून टीका करण्यात आली आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्यासह उद्धव ठाकरे यांनीही जोरदार टीका केली आहे.
याच दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेचा सहारा घेत अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या आहे त्या आभासी आहे. अर्थसंकल्प सादर करत असतांना फक्त गाजर हलवा असा अर्थसंकल्प असल्याचे म्हंटले आहे.
अर्थसंकल्प सादर करत असतांना तुकाराम महाराज यांचे नाव घेण्यात आले. त्यांच्या देहुत आज कुठलाही निधी जाहीर करण्यात आला नाही. महापुरुषांच्या नावाने त्यांच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला होता. त्यावरून कुठेही उच्चार काढला नाही.
काही दिवसांवर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन आहे. त्यापार्श्वभूमीवर कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख नाही असे अमोल मिटकरी यांनी म्हणत संताचे नाव घेऊन फक्त राजकारण केले जात असल्याचे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान आज शिंदे – फडणवीस सरकारच्या वतीने राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये दरवर्षी पंचसूत्रीच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात होता. यंदाच्या प्रथमच पंचामृत ध्येय धोरणानुसार अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.
यामध्ये आरोग्य सुविधा, महिलांसाठी विशेष योजना आणि शेतकऱ्यांसाठी अक्षरशः घोषणांचा पाऊस पडला आहे. आगामी काळातील निवडणुकीच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प असल्याचे बोललं जात असतांना त्यावरूनही विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे.
दरम्यान शिंदे – फडणवीस सरकारकडून पंचामृत ध्येय धोरणांवर सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी हा अर्थसंकल्प असल्याचे सांगत राज्याला पुढे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प असल्याचा दावा करण्यात आला आहे.