आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट, शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्षांना समन्स, पुढे काय घडणार?
याप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष आणि माजी उनगराध्यक्षांना समन्स पाठवण्यात आले आहे. हे दोघेही किणीकरांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.
MLA Balaji Kinikar Case : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. बालाजी किणीकर हे एका कार्यक्रमाला लातूरला गेलेले असताना त्यांच्या हत्येचा प्लॅन होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यातच आता याप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्षांना समन्स पाठवण्यात आले आहे. हे दोघेही किणीकरांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.
दोघांना चौकशीसाठी समन्स
अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्याच्या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि त्यांचे बंधू माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्यामुळे या दोघांचा या कटात काही सहभाग होता का? हे आता पोलिसांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.
थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. अरविंद वाळेकर आणि आमदार बालाजी किणीकर यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोघांनाही एकत्र आणत समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत बालाजी किणीकर हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. मात्र यानंतर त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत किणीकर यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही थेट पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार नोंदवली होती.
अंबरनाथमध्ये मोठी खळबळ
त्यानुसार अंबरनाथमधून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. तसेच शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तसेच माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि त्यांचे बंधू माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. या समन्सची प्रत आता समोर आली आहे. त्यात एका गंभीर गुन्ह्याच्या चौकशीसाठी हजर राहण्यास वाळेकर बंधूंना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यामागे खरोखर वाळेकर बंधू होते? की त्यांना यात गोवलं जातंय? हे पोलीस तपासातच निष्पन्न होऊ शकणार आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमुळे अंबरनाथमध्ये मोठी खळबळ माजली आहे.