काँग्रेस-राष्ट्रवादीचे तीन आमदार राजीनामा देणार, भाजपमध्ये प्रवेश करणार – सूत्र
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीला लागलेली मेगागळती थांबायचं नाव घेत नाही. कारण आता तब्बल तीन आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीला लागलेली मेगागळती थांबायचं नाव घेत नाही. कारण आता तब्बल तीन आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये पंढरपूर – मंगळवेढ्याचे काँग्रेस आमदार भारत भालके, अक्कलकोटचे काँगेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांची नावं आहेत. हे तीनही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिद्धराम म्हेत्रे आणि बबन शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. शिवाय भारत भालकेंची दबकी चर्चा होती. मात्र आता हे तीनही आमदार राजीनामा देऊन कमळ हाती घेण्याची चिन्हं आहेत.
जुलै महिन्यात काँग्रेसकडून सोलापूरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीला अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनी थेट दांडी मारली होती. तेव्हापासून म्हेत्रे आणि भालके यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते.
दुसरीकडे पंढरपूरचे आमदार भारत भालके देखील काही दिवसांपासून मुख्यमंत्र्याच्या संपर्कात आहेत. तेही भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यांनीही आज मुलाखतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे भारत भालके देखील भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात होतं. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे 3 आमदार आहेत. त्यापैकी एकमेव प्रणिती शिंदे यांनी मुलाखतीला हजर राहून सोलापूर शहरातून (मध्य) उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं.
कोण आहेत सिद्धराम म्हेत्रे?
- सिद्धाराम म्हेत्रे यांनी आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्रीपद भूषवलं
- 1997 च्या पोटनिवडणुकीत अक्कलकोट विधानसभेचे काँग्रेसचे आमदार
- सिद्धराम म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत
- सोलापूरच्या राजकारणात सिद्धराम म्हेत्रे यांचा दबदबा आहे.
- सिद्धराम म्हेत्रे हे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.
- सोलापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत
- भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात म्हेत्रेंनी तालुका काँग्रेसमय केला
- गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाबाबत नाराजी
संबंधित बातम्या