फडणवीसजी, 3 महिन्यांचं बाळ ‘हे’ पाणी पितं, तुम्हीपण प्या, अंघोळ करा, कुणी दिलंय आव्हान?
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सुरु केलेलं हे आंदोलन सध्या विदर्भात चर्चेचा विषय ठरतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात आणखी दहा दिवसांनी ही यात्रा पोहोचेल.
विवेक गावंडे,अकोला: अमरावती (Amaravati) आणि अकोला (Akola) जिल्ह्यातील महिलांनी अनोखी मोहीम सुरु केली आहे. या परिसरातील बहुतांश भाग हा खारपान पट्टा आहे. त्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून खारं पाणी प्यावं लागतं. यामुळे अनेक आजार उद्भवतात. अगदी ३ महिन्याच्या लहान बाळालाही हे खारं पाणी पाजावं लागतं, हा त्रास आम्ही अनुभवतोय, तसा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीही अनुभवावा, या भावनेतून महिलांनी आंदोलन सुरु केलंय. या परिसरातील तब्बल 69 गावांतील महिलांनी आपापल्या गावातलं पाणी एका ठिकाणी जमा करायचं ठरवलंय आणि हे पाणी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नेण्यात येईल. बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या पुढाकारातून महिलांकडून हे आंदोलन करण्यात आलंय.
अकोला ते नागपूर पदयात्रा
आमदार नितीन देशमुख यांनी 69 खेड्यांसाठी पदयात्रा सुरु केली आहे. अकोल्याहून अमरावती आणि त्यानंतर नागपूरपर्यंत ही पदयात्रा ते नेणार आहेत. 10 एप्रिल पासून अकोल्यातून ही यात्रा सुरु झाली आहे. नागपूरपर्यंत पदयातत्रेला सुरवात केली असून ही पदयात्रा 21 एप्रिलला नागपूर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी पोहचणार आहे.तेथे त्यांना ६९ गावांतील महिलांनी दिलेलं पाणी प्यायला दिलं जाईल. नितीन देशमुख यांच्या आंदोलकांचा ताफा या सर्व गावांतून फिरत एका टँकरमध्ये हे पाणी घेऊन जात आहेत.
काय म्हणाले आमदार नितीन देशमुख?
या पदयात्रेविषयी बोलताना आमदार नितीन देशमुख म्हणाले, ‘ हा बाळापूरमधलाच नाही तर संपूर्ण पश्चिम विदर्भातला प्रश्न आहे. अमरावतीत, अकोल्यातला मूर्तिजापूर, दर्यापूर, बाळापूर, अकोट असा भाग खारपान पट्टा आहे. या महिलांनी ३ दिवसाच्या बाळाला जे पाणी पाजते, त्या महिलांनी जमा केलेलं पाणी ज्या आत्मसन्मानाने जमा केलंय. देवेंद्रजी, तुम्ही हे पाणी पिऊन पहा. २५०-३०० किलोमीटर पाणी घेऊन चाललेत. त्या महिलांनी दिलेलं पाणी घेऊन जाणार आहेत. ते निश्चित पाणी पितील आणि अंघोळही करतील, असा विश्वास नितीन देशमुख यांनी व्यक्त केला.
पदयात्रा अडवणार?
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सुरु केलेलं हे आंदोलन सध्या विदर्भात चर्चेचा विषय ठरतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात आणखी दहा दिवसांनी ही यात्रा पोहोचेल. मात्र या पदयात्रेदरम्यान काही आडकाठी केली जाईल का, अशी शक्यताही बोलून दाखवली जातेय. यावर आमदार नितीन देशमुख म्हणाले, ‘ मला अडविण्याचा प्रश्न येत नाही. या टँकरमध्ये दारू नाही किंवा ऍसिडदेखील नाही. आम्ही पाणी घेऊन चाललो तुम्ही राज्यकर्ते आहेत पालकमंत्री आहेत तिथची जनता कस पाणी पीते हे पाहावे आणि पाणी प्यावे आणि अंघोळ करावी हीच मागणी आमची आहे, अशी भावना आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केली.