आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून ७५ तोळ्यांचं सोनं देवीला अर्पण, इतकी संपत्ती आली कुठून?
शिंदे गटानं दसरा मेळावा भरविला. तेव्हा एसटी महामंडळाला दहा कोटी रुपये दिले होते.
शिर्डी – शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजा भवानी मातेला ७५ हजार रुपयांचं सोनं अर्पण केलंय. बोललेलं नवस पूर्ण केल्याचं सरनाईक यांनी म्हंटलं. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात केलेल्या खर्चाची चौकशी करणारी ईडी या सोन्याची चौकशी कधी करणार, असा प्रश्न विरोधकांनी विचारलाय. या ७५ तोळं सोन्याची किंमत ३७ लाख ५० हजार रुपयांच्या घरात आहे. आमदार सरनाईक यांची पत्नी, दोन्ही मुलं आणि सुना व नातवंडांसोबत ते तुळजा भवानी मातेच्या दर्शनाला आले होते.
पहिल्या मुलाच्या लग्नाच्या वेळी ५१ तोळं सोन्याची पादुका आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी २१ तोळ्याच्या सोन्याचा हार अर्पण करण्याचा नवस केला होतो. दोन वर्षांपासून हे दागिने त्यांच्याकडं होते. पण, दोन वर्षांपासून मंदिर बंद असल्यामुळं तो नवस आता फेडण्यात आलाय. सरनाईक यांच्या या दाव्यानंतर विरोधकांनी प्रश्न उभे केलेत.
संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चाची चौकशी करण्यासाठी ईडी आली होती. आता सरनाईक यांनी अर्पण केलेलं सोनं दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला.
अंबादास दानवे म्हणाले, संजय राऊत यांच्या लग्नामध्ये मेहंदी लावणाऱ्याची चौकशी झाली. फूल सजावट करणाऱ्याची चौकशी झाली. आता अशाप्रकारे संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन करतात. ईडी या संस्थेला हे दिसत नाही का, असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी विचारलाय.
प्रताप सरनाईक हे रिक्षाचालक होते, असं सांगतात. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतर त्यांनी राळ उठवली होती. लग्नातील खर्चावर ईडीची चौकशी झाली पाहिजे. आज सोन्याच्या पादुका आणि हार अर्पण करण्यात आला. इतका पैसा या लोकांकडं कुठून आला, असा सवालही राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारला.
शिंदे गटानं दसरा मेळावा भरविला. तेव्हा एसटी महामंडळाला दहा कोटी रुपये दिले होते. ते पैसे कुणी दिले होते, असाही सवाल ठाकरे गटानं विचारलाय.