‘खुटा हलवून जाम करण्याचा प्रकार’, सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीतील घडामोडींवर खोचक टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींवर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी तर ट्विटरवर बैलाचा फोटो ट्विट करत खोचक शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर आता त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी या घडामोडींवर खोचक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या घडामोडींवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी बैलाचा फोटोही ट्विट करत त्याला खोचक असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या खोचक ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
खरंतर सदाभाऊ खोत यांनी ग्रामीण भागातील म्हण वापरत राष्ट्रवादी पक्षावर टीका केली आहे. ग्रामीण भागात बैल बांधण्यासाठी खुटा वापरला जातो. पण या खुटाचा उल्लेख असलेल्या म्हणीच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. “आज शरद पवार साहेबांनी राजीनामा मागे घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते सोंगाड्या खेळ खेळले. याला गाव गाड्यात लोक म्हणतात हलवून खुटा जाम करण्याचा प्रकार”, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवर केली आहे. त्यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आज शरद पवार साहेबांनी राजीनामा मागे घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते सोंगाड्या खेळ खेळले. याला गाव गाड्यात लोक म्हणतात “हलवून खुटा जाम करण्याचा प्रकार”#SharadPawar pic.twitter.com/8JarhL4ncm
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) May 5, 2023
शरद पवार पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
“लोक माझ्या सांगाती या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशन समारंभाच्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सामाजिक जीवनातील प्रदीर्घ प्रवासानंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती. पण मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसात तीव्र भावना उसटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेले जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली”, असं शरद पवार म्हणाले.
“मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक माझ्यावर विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होवून एकमुखाने मला आवाहन केलं. त्याचबरोबर जनमनातून, विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षाचे सहकारी आणि कार्यकर्ते मी अध्यक्ष होण्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती केली. लोक माझ्या सांगाती हे माझ्या सामाजिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडे जवभावनांचा अनादर होऊ शकत नाही”, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.
“आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेलं आवाहन तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमुळे, या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला. या सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे”, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.