नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे (Satyajit Tambe) हे राजकीय भूमिका कोणती घेणार ? अशी चर्चा होती. निवडणूक काळात सत्यजित तांबे यांच्यावर कॉंग्रेससह (Congress) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केले होते. सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेसची फसवणूक केली, तांबे कुटुंबाने धोका दिला असा आरोपही झाला होता. त्यात सत्यजित तांबे यांना भाजप कडून पाठिंबा दिला गेला होता. स्थानिक पातळीवर भाजपच्या (BJP) नेत्यांनी सत्यजित तांबे यांना उघड मदत केली होती. याशिवाय पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांना संधी द्या नाहीतर आमचा डोळा आहे. चांगली माणसं आम्हाला जमा करायची असतात असं म्हंटलं होतं. याशिवाय नाशिकमध्ये भाजपने उमेदवारही दिला नाही त्यामुळे सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती.
संपूर्ण निवडणूक काळात सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेससह इतर नेत्यांनी केलेल्या आरोपावर पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे.
सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, असं सांगत मी कॉंग्रेसकडूनच उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण मला एबी फॉर्म न मिळाल्याने मी अपक्ष झालो असा दावा केला आहे.
सत्यजित तांबे यांनी याशिवाय कॉंग्रेसकडून मला उमेदवारी मिळू नये यासाठी कसे प्रयत्न झाले असं सांगत असतांना मला शिक्षक भारती संघटना यांसह विविध संघटना यांनी मदत केल्याचे सांगितले.
याशिवाय शंभर टक्के कॉंग्रेसने मदत केली, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपसह मनसेने सुद्धा मदत केली असेही सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी सत्यजित तांबे यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर करत असतांना मी कॉंग्रेस सोडलेली नाही, पण मी अपक्ष निवडून आलो आहे मी अपक्षच राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
माझ्या भाजप प्रवेशाचा ज्यांना संशय आला ते कच्चे आहे म्हणत नाना पटोले यांना टोला लगावला आहे. याशिवाय मला कॉंग्रेस प्रदेश कार्यालयातून कशी वागणूक मिळाली याबद्दलही सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनीही मला कुठलीही संधी दिली नाही. आमदार खासदारकी नको होती, कुठलं तरी पद मागत होतो तेही दिले नाही असेही सत्यजित तांबे म्हणाले आहे.
बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र होतं, त्यातून थोरात आणि तांबे कुटुंबाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. चुकीचे एबी फॉर्म दिल्याने मला अपक्ष अर्ज दाखल करावा.
वडिलांनी कष्टातून नाशिकचा मतदार संघ उभा केला आहे. त्यामुळे मी त्यांच्या जागेवर उभे राहणं योग्य नव्हतं पण अशावेळी मला उभं राहावं. वडिलांनी त्यांची जागा मला दिली ते मला मित्रा सारखे आहे असेही सत्यजित तांबे म्हणाले आहे.
दरम्यान कॉंग्रेसने निलंबन चुकीच्या पद्धतीने केलं, न्याय मागण्याचा अधिकार नाही का ? असा सवाल उपस्थित करत नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मी देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार मानतो, मी पाठिंबा मागायला गेलो नाही, मात्र त्यांनी तयारी दर्शवली होती असे सांगत त्यांचेही आभार मानले आहे.
एकीकडे राहुल गांधी भारत जोडो म्हणतात, मात्र प्रदेश काँग्रेसमध्ये द्वेषाचे राजकारण सुरू आहे, माझं कुणा सोबत वैर नाही. मी काँगेस सोडलीच नाही असे म्हणत सत्यजित तांबे यांनी राजकीय भूमिका मांडली आहे.