सत्यजित तांबे यांचं ठरलंय, आज सर्वच राजकीय हिशोब चुकता करणार, राजकीय भूमिका काय असणार?
संपूर्ण निवडणूक काळात कुठलाही दगाफटका होऊ नये याकरिता राजकीय भाष्य न करणारे सत्यजित तांबे आमदार झाल्यावर आपली राजकीय भूमिका आज नाशिकमध्ये मांडणार आहे.
नाशिक : नाशिक विधान परिषदेचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे ( MLA Satyajit Tambe ) हे आज आपली राजकीय भूमिका मांडणार आहे. सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राजकीय भूमिका नेमकी काय असणार? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. यानंतर सत्यजित तांबेही योग्य वेळ आल्यास मी बोलेन असं म्हणून राजकीय बोलणं ( Political News ) टाळत होते. त्यामुळे सत्यजित तांबे यांचं मौन कशासाठी यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. निवडणूक झाल्यानंतर आता सत्यजित तांबे आपली भूमिका नाशिकमध्ये मांडणार आहे. दुपारी चार वाजता सत्यजित तांबे हे कालिका मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात पत्रकार परिषद ( Press Conference ) घेणार आहे.
नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांना राजकीय भूमिका मांडण्यासाठी योग्य वेळ आल्याचे बोललं जात आहे. सत्यजित तांबे यांनीही यासाठी स्थळ आणि वेळ ठरवली आहे.
सत्यजित तांबे हे पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. आगामी काळात कोणत्या पक्षाचा हात धरणार याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागून आहे.
सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी नाशिकमध्ये बोलत असतांना सत्यजित तांबे यांनी अपक्षच राहावं असा सल्ला दिला होता तर दुसरिकडे अजित पवार यांनी कॉंग्रेसचे सहयोगी राहावे असा सल्ला दिला होता.
सत्यजित तांबे यांना स्थानिक पातळीवर भाजपने मदत केली हे उघड होते. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या राजकीय करकीर्दीची सुरुवात भाजपच्या मदतीने झाल्याचे बोललं जात आहे.
सत्यजित तांबे हे भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा आहे. सत्यजित तांबे यांची अपक्ष उमेदवारी ही देवेंद्र फडणवीस यांची खेळी होती अशीही चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात सुरू होती.
बाळासाहेब थोरात यांच्या दृष्टीने सत्यजित तांबे यांची राजकीय भूमिका डोकदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या पत्रकार परिषदेकडून संपूर्ण राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
नाना पटोले यांनी केलेले आरोप, कॉंग्रेसने केलेले निलंबन यांसह देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली राजकीय खेळी यावर सत्यजित मौन सोडणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.