“…हा महाराष्ट्र संजय राऊतांमुळे गढूळ होत चाललाय”; शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटावर साधला निशाणा…
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र संजय राऊत यांच्यामुळे गढूळ होत चालला आहे. अशी जोरदार टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
अहमदनगरः महाराष्ट्रात सहा महिन्यापूर्वी सत्तांतर झाल्यापासून शिंदे-ठाकरे गटाकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता सहा महिन्यानंतर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे प्रचाराच्यानिमित्ताने आणखी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच काय झाडी, काय डोंगर या मोबाईलवरील संभाषणामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या आमदार शहाजी बापू यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र संजय राऊत यांच्यामुळे गढूळ होत चालला आहे अशी जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे ठाकरे-शिंदे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सहा महिन्यापूर्वी अस्तित्वात आले असले तरी, हे सरकार असंविधानिक असल्याची टीका सातत्याने ठाकरे गटाकडून केली जाते. त्या टीकेला तेवढ्याच जोरदार पणे शिंदे गटाकडून प्रतिक्रिया दिली जात असतात.
यावेळीही आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटावर टीका करताना शिंदे गटाचा गौरव करत शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारची राज्यात विकासाची घोडदौड जोरदारपणे सुरू असल्याचे सांगितले.
सहा महिन्यात स्थापन झालेल्या सरकारने विकासाबाबत कोणतीच कसूर सोडली नाही. त्यामुळेच महाराष्ट्राची जनता ही शिंदे-फडणवीस यांच्या पाठीशी उभा आहे असा विश्वासही त्यांनी .यावेळी व्यक्त केला.
आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर काही दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्राला जागृत करण्याची गरज नाही. कारण आता शिंदे-फडणवीस सरकारबरोबर महाराष्ट्रातील जनता आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी आपण महाराष्ट्रातील राजकारण हे 1962 पासुन आपण पाहतो आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र संजय राऊत यांच्यामुळे गढूळ होत चालला आहे. अशी जोरदार टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
तर प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे युतीबाबत प्रकाश आंबेडकरच सांगू शकतील असं म्हणत त्यांच्या युतीबद्दल त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली.