सांगलीतील अपक्ष खासदाराला मंत्रिपदाचे वेध, थेट भाजप मंत्र्यांसमोरच बोलून टाकलं “भविष्यात काँग्रेस…”
सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता चर्चेत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्के बसत आहेत. सांगलीत काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये जाऊन मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. काँग्रेसला पाठिंबा दिलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकतंच एका कार्यक्रमात याबद्दलचे सूचक विधान केले. भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन, असे वक्तव्य अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यासह काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने सांगलीत डिजिटल मीडियाचे राज्य अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन प्रसंगी सांगलीचे खासदार विशाल पाटील, जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे,संजय भोकरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी बोलताना विशाल पाटील यांनी एक मोठे विधान केले.
आम्हाला मंत्रीपद मिळावं
“जयकुमार गोरे इथे आलेले आहेत. ते आपले जावई आहेत. त्यांची सासरवाडी आमच्या शेजारी आहे, आमच्या भिंतीला भिंत लावून आहे. योगायोग असा की ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. मी देखील अपक्ष निवडून आलो. मी आता परत काँग्रेसमध्ये जाईन किंवा कोणत्या तरी पक्षात जाईन. पण कुठेतरी पुढे जाऊन आम्हाला मंत्रीपद मिळावं अशी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात व्हावी, अशी मी अपेक्षा करतो”, असे विशाल पाटील म्हणाले.
राजकीय प्रवास हा परिस्थितीनुसार असतो. शेवटी मतदारसंघातील कामे व्हावी लागतात. आपला भाग, जिल्हा पुढे न्यायचा असतो. त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं, पण त्यांनी पक्षापलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत एखादा सदस्य जर काही वर्षांपूर्वी त्यांच्या संपर्कात आला असेल तर त्यालाही माझा भाऊ आज या ठिकाणी मंत्री झालेला आहे, असेही विशाल पाटील यांनी म्हटले.
अनेकांच्या भुवया उंचवल्या
त्यांच्या या विधानामुळे खासदार विशाल पाटील मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगली आहे. विशाल पाटलांच्या या भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच काँग्रेस वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. तसेच ते भाजपच्या वाटेवर आहेत का? आता प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.