मोठी बातमी! ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता करणार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
ऐन विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला आहे, बड्या नेत्यानं राज ठाकरे यांची साथ सोडली असून शिवसेना ठाकरे गटाता प्रवेश करणार आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला आहे, बड्या नेत्यानं मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र या दौऱ्यापूर्वीच राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे माजी महापौर आणि मनसे नेते अशोक मुर्तडक हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हा मनसेसाठी नाशिकमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. आज सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असून, या सभेमध्ये मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक हे पक्षप्रवेश करणार आहेत.
कोण आहेत अशोक मुर्तडक?
अशोक मुर्तडक हे नाशिकचे माजी महापौर आहेत. मनसेची सत्ता असताना अडीच वर्ष ते नाशिकचे महापौर होते. मनसेचा नाशिकमधील बडा नेता अशी त्यांची ओळख आहे. अशोक मुर्तडक यांच्या पक्ष प्रवेशामुळे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकत वाढणार आहे. अशोक मुर्तडक हे महाराष्ट्र नव निर्माण सेनेत प्रदेश सरचिटणीस या पदावर देखील होते. मात्र आज ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मशाल हाती घेणार आहेत. हा मनसेसाठी नाशिकमध्ये मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे, महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे यावेळेची निवडणूक ही अत्यंत अटितटीची आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे. वरवर पाहाता ही निवडणूक जरी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी असली तरी देखील या निवडणुकीत मनसे, तीसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी अशा पक्षांची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. या पक्षांमुळे राज्यात काही उमेदवारांच्या मतांचं गणित बिघडू शकतं अशी चर्चा आहे. मात्र दुसरीकडे राज्यात मनसेच्या मदतीनं महायुतीचं सरकार येईल असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे, त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.