मुंबई : “अग्निशमन दलातील जवान, पोलीस यांनाही कुटुंब असतं. आज माझा नवरा बाहेर गेल्यावनंतर आग लागल्यावर कुठे फसेल? अशा धाकधुकीमध्ये महिला असतात. पोलीस खातं सुद्धा असच आहे. कधी काय घडेल? ते सांगता येत नाही. समाजाच्या जाणीवा जिवंत असल्याच पाहिजेत, त्यासाठीच अग्निशमन दल आणि पोलिसांच जास्तीत जास्त कौतुक झालं पाहिजे” असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. आज रस्ते, साधन-सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन आहे.
राज ठाकरे या कार्यक्रमात बोलत होते. आपातकालीन यंत्रणा म्हणजे नाला तुंबण नव्हे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
राज ठाकरेंनी रायगडावरचा काय किस्सा सांगितला?
त्यांनी रायगडावरचा एक किस्सा यावेळी सांगितला. “मी रायगडावर गेलो होतो. खाली उतरल्यानंतर गाडीत बसताना चार-पाच जण आले. त्यांनी सांगितलं की, आम्ही चिपळूनहून आलो आहोत. मागच्यावर्षी पावसाने तडाखा दिला. त्यावेळी फक्त मनसे आमच्या मदतीला धावून आली. बरं झालं, तुम्ही इथे भेटलात कधीतरी आभार मानायचे होते. आज इथे आभार मानतो” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
तर मग माझ्याकडे कशाला येता?
“मला प्रश्न पडतो की, सर्व प्रसंगात आपण धावून जातो. मग मतदानाच्यावेळी सर्व कुठे जातात?. नाशिकला शेतकरी बांधवांना भेटलो. तिथल्या लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं, आमदार या पक्षाचा, खासदार या पक्षाचा. मी म्हटलं जे तुमची पिळवणूक करतात, त्यांच्या हातात सर्व देणार असाल, तर माझ्याकडे कशाला येता?” त्यावर यापुढे असं होणार नाही, म्हणून त्यांनी सांगितल्याच राज ठाकरे म्हणाले.
आयपीएल फायनलवरुन टीका
“जगभरात आपातकालीन घटना घडतात, खासकरुन परदेशात त्यावेळी काय व्यवस्था असतात त्यांच्याकडे. मी दुबई शारजाचा फोटो पाहिला. स्टेडियममध्ये पाऊस पडला. पाऊस पडला तर समोरचा पीच सुकवण्यासाठी यंत्रणा होत्याच. पण त्यांनी हेलिकॉप्टर आणलं, त्याच्या वाऱ्याने पीच सुकवलं. आमच्याकडे अहमदाबादला उद्या मॅच आहे आणि आज हेयरड्रायरने पीच सकुवतोय. एवढं, एवढं बारीक गवत हेयरड्रायरने सुकवतोय” आपल्याकडे आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कशा प्रकारच्या यंत्रणा असल्या पाहिजेत याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं.