एमआयजी क्लबमध्ये महत्त्वाचे निर्णय होणार?, राज ठाकरे यांची तातडीची बैठक; राजकारणातील सर्वात मोठी बातमी येणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मनसे यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु, राज ठाकरे महायुतीच्या व्यासपीठावर जाऊन भाषण करणार की नाही? महायुतीच्या प्रचार रॅलीत सामील होणार की नाही? याबाबत सस्पेन्स आहे. हा सस्पेन्स आज दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेचा एकही उमेदवार या निवडणुकीत नसणार आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर मनसे पदाधिकारीही या निर्णयावर नाराज झाल्याने त्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसेत खळबळ उडालेली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यासाठीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मनसेतून महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी येऊ शकते, अशीही चर्चा रंगली आहे.
एमआयजी कल्बमध्ये या बैठकीचं आयोजन केलं आहे. यावेळी राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच या बैठकीला बोलावलं आहे. मनसे नेते अविनाश अभ्य्यांकर, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत. राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. मात्र, मोदींसाठी राज ठाकरे सभा घेणार की नाही? कार्यकर्त्यांनी प्रचारात जायचं की नाही? जायचं तर कुणी जायचं? प्रचारातील मनसेची भूमिका काय असेल? आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे मोदींसाठी महायुतीच्या व्यासपीठावर जाऊन निर्णय घेणार की नाही? याबाबतचा निर्णय आज होऊ शकतो. त्यामुळेच या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
दरम्यान, राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर मनसेत नाराजीचे सूर उमटत आहेत. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय समजावतात? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काही कार्यक्रम देणार आहेत का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
विधानसभेवर चर्चा?
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले होते. आजच्या बैठकीतही विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार की नाही याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळेही आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तसेच विरोधकांकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेची खिल्ली उडवली जात आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.