राज ठाकरे यांनी मोदींच्या आधी भाषण का केले?, आशिष शेलार यांचा दावा काय ?
शिवाजी पार्क मैदानावर ऐतिहासिक सभा पार पडली. या सभेला महायुतीच्या नेत्यांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेनिमित्त एकाच मंचावर आले. एवढंच नव्हे तर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान देशभरात पार पडत असून मुंबईतील सहा जागांसह महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान होत आहे. तत्पूर्वी महायुतीच्या उमेदवारांसाठी गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ऐतिहासिक सभा पार पडली. या सभेला महायुतीच्या नेत्यांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेनिमित्त एकाच मंचावर आले. एवढंच नव्हे तर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं. त्यामुळे प्रोटोकॉल बाजूला सारुन महायुतीने राज ठाकरे यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली अशी चर्चा सुरू झाली. त्यावरून विरोधकांनी टीकाही केली.
मात्र त्यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनीच चोख प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरे यांना पंतप्रधान मोदींच्या आधी बोलण्याची संधी दिली. पंतप्रधान मोदींच्या सोबत राज ठाकरे यांचे सौहार्दाचे संबंध आले. यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
मुंबईकर महायुतीसाठीच मतदान करतील
मुंबईतील सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. याबद्दल आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या, त्याला जो प्रतिसाद मिळाला ते पाहता मुंबईकर मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील आणि महायुतीसाठीच मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई ही आर्थिक राजधानी त्यामुळे महायुती साठी सहाही जागा महत्त्वाच्या आहेत असे त्यांनी नमूद केले.
निकालात उद्धव ठाकरेंचा नंबर खालचा
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खालच्या दर्जाची भाषा विरोधकांनी विशेषत: उद्धव ठाकरेंनी वापरली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालातही उद्धव ठाकरे गटाचा नंबर खालचाच राहील असा टोला शेलार यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी जी भाषा पंतप्रधान मोदी यांच्यासाठी वापरली ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही असेही ते म्हणाले. शाळेतला हुशार विद्यार्थी आपल्या अभ्यासावर भर देत असतो ढ विद्यार्थी मात्र अभ्यास करण्यापेक्षा हुशार विद्यार्थ्याला दोष देतात हीच परिस्थिती विरोधकांची झाली आहे. 25 पंचवीस सभा झाल्या, म्हणून त्यांचा जळफळाट होत आहे,अशी टीकाही त्यांनी केली.