Raj Thackrey : राज ठाकरे यांचीही तोफ दसऱ्याच्या दिवशी धडाडणार, टार्गेटवर कोण?; निवडणुकीच्या तोंडावर मोठा धमाका होणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील बिघडलेल्या राजकारणावर वारंवार टीका केली आहे. मात्र, आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने राज ठाकरे पुन्हा एकदा या बिघडलेल्या राजकारणावर आसूड ओढण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या दसऱ्याच्या दिवशी पहिल्यांदाच राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहेत. राज ठाकरे हे उद्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या पहिल्याच भाषणात टार्गेटवर कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात अनेक तोफा धडाडत असतात. शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडत असते. तर गेल्या वर्षीपासून दसऱ्याच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही तोफ दसऱ्याच्या दिवशीच धडाडते. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचीही तोफ दसऱ्याच्या दिवशी धडाडत असते तर मनोज जरांगे पाटील ही उद्याच दसऱ्याच्या दिवशी तोफ डागणार आहेत. मात्र, यंदा पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे हे कोणत्याही मैदानात जाहीरसभा घेणार नाहीत. ते पॉडकास्टवरून संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे पहिल्यांदाच पॉडकास्टवरून बोलणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांचीही तोफ धडाडणार असल्याने राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाबाबतची माहिती दिली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच राजसाहेब पॉडकास्टच्या माध्यमातून बोलणार आहेत. आम्हालाही तेवढीच उत्सुकता आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवायची वेळ आलेली आहे आणि ती मनसे टिकवणार. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या उद्देशाने आम्ही वाटचाल करत आहोत, असं संदीप देशपांडे म्हणाले.
राऊतांनी शिकवू नये
यावेळी संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. संजय राऊत वाट्टेल ते बोलतात. पण आम्हाला नाव ठेवताना त्यानी या आधी नेमक काय केलंय ते पाहावं. त्यांनी शरद पवार यांचे पाय चाटले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचे पाय चाटले. राऊत यांनी आम्हाला सांगू नये. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे घेऊन निवडणुकीला समोर जात आहोत. आमची तयारी पूर्ण आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केलीय.
ठाकरेंच्या आधी ठाकरे…
शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्या आधी राज ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. पॅाडकास्ट आणि सोशळ मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी हा संवाद साधला जाणार आहे. जाहिरात आणि पॅाडकास्टच्या माध्यमातून ‘अभी नही तो कभी नही‘ या थीमवर मनसे कामाला लागली आहे. विधानसभेला राज आणि त्यांचा पक्ष ताकदीनं मैदानात उतरणार आहे. त्यामुळे राज यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जोरदार जाहिरातबाजी
राज ठाकरे यांच्या पॉडकास्टची जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे. वृत्तपत्रातून याच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, चला, पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारूया. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा… असं जाहिरातीत म्हटलं आहे. या जाहिरातीत राज ठाकरे यांचा मोठा फोटो असून त्यावर हा मजकूर आहे.