अशोक सराफ काय सख्खे मामा लागतात का तुझे?; राज ठाकरे कलाकारांवर का भडकले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मराठी कलावंतांची शाळाच घेतली. मराठी इंडस्ट्रीत सर्वजण एकमेकांना आपुलकीने एकेरी नावाने किंवा टोपणनावाने हाका मारतात. यावर राज ठाकरे यांनी तुम्ही जर एकमेकांना मान दिला नाही. तर बाकीचे तुम्हाला कशाला मान देतील अशी विचारणा केली.
पुणे | 7 जानेवारी 2024 : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मराठी कलावंताचे कान टोचले. इतर साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीत एकमेकांचा कसा मान आणि आब राखला जातो. आणि मराठी कलाकार एकमेकांना घरातील लाडक्या टोपन नावाने हाका मारतात. मराठीत आज स्टार नाहीत, कलावंत आहेत. महाराष्ट्रातील कलावंत पब्लिकमध्ये एकमेकांना शॉर्टफॉर्ममध्ये एकमेकांना हाका मारतात. अंड्या काय, पचक्या काय ? अशोक सराफ यांना मी अशोक सरच नावाने बोलवतो. त्यांना मामा म्हणायला ते काय तुमचे सख्खे मामा लागतात का ? इतका मोठा कलावंत आहे त्यांना अशोक सर म्हणा ना असा सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी नाट्यक्षेत्राविषयी माझी मुलाखत घ्यावी असे आपण काही केलेले नाही. मला चित्रपट निर्मितीत रस आणि आवड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले मराठी कलाकारांनी ऑन स्टेज एकमेकांना टोपन नावाने बोलावणे योग्य वाटत नाही. तुम्हीच जर एकमेकांना मान दिला नाही तर मग पब्लिक तुम्हाला काय मान देणार ? मागे एकदा अशोक सराफांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांना मी सरच म्हणतो. ही सर म्हणण्यासारखीच माणसे. यांना सर म्हणायचे नाही तर पब्लिकली मामा आले का ? म्हणायचे. सख्खे मामा लागतात का ते तुझे ? इतका मोठा कलावंत आहे ना म्हणाणा सर असे राज ठाकरे यांनी ठणकावले.
आपुलकी तुमच्या घरात ठेवा !
ते पुढे म्हणाले की कशासाठी ही आपुलकी. ही आपुलकी तुमच्या घरात ठेवा. लोकांसमोर याल तर एकमेकांना मान द्या. तरच या सिनेमासृष्टीला अर्थ आहे. साऊथमधील नवे लोक पाहा कसे नम्र बसतात. आपल्याकडे कुणीही येतं आणि खांद्यावर हात ठेऊन बसत. समजा आता इथे शरद पवार साहेब आले तर त्यांना मी वाकून नमस्कार करेन. माझ्या महाराष्ट्रातील एक बुजुर्ग नेता आहे. व्यासपीठावर राजकीय काय बोलायचं हा विषय वेगळा आहे. मला वाटतं तुम्ही उलटं करतात. हातजोडून विनंती आहे. तुम्ही एकमेकांना मान द्या. संपूर्ण नाव द्या. तुम्ही त्यांना सर म्हणा. अरुण सरनाईक यांना कुणी आरू बिरू हाक मारलेली. मला नाही आठवत श्रीराम लागूंना शिरूबिरू हाक मारलेली मला नाही आठवत. लागू साहेब आले असं आपण म्हणतो ना असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.