बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप वरळीत आणूया ! मनसेच्या बॅनरची चर्चा
गामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना वि शिवसेना (उबाठा गट) असा सामना रंगताना दिसत आहे. कारण मुंबईतील वरळी येथे मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बॅनर्स लावले आहेत.
लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच आता आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना वि शिवसेना (उबाठा गट) असा सामना रंगताना दिसत आहे. कारण मुंबईतील वरळी येथे मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बॅनर्स लावले असून हे बॅनर वॉर सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. बॅनर्सवर आदित्या ठाकरे यांना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले असून विधानसभेसाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेती विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याच्यी शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
बॅनरवर लिहीलंय तरी काय ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वरळीत ठिकठिकाणी ही बॅनर्स लावली आहेत. त्यावर आदित्य ठाकरे यांचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख करण्यात आला आहे. ‘ बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया. जनमनातला आमदार, संदिप (देशपांडे) वरळीत आणूया. वरळीचे भावी आमदार (मनसे नेते) श्री. संदिप देशपांडे सन्माननिय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार.. विधानसभेत पाठवूया..’ असा संदेश या बॅनरववर लिहीण्यात आला आहे.
राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी डागली होती तोफ
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावरून ठाकरे गटासह मविआने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. नुकताच शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन झाला. ठाकरे गटाचा सोहळा षण्मुखानंद सभागृहात झाला तेथे उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेताच निशाणा साधला. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन शर्ट’ पाठिंबा दिला, उघड पाठिंबा दिला असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.
मनसे नेत्यांकडून टीकास्त्र
मात्र त्यांची राज ठाकरेंवरील ही टीका मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना फारशी रुचलेली नाही. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘ कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त” आणि ‘शर्ट’ असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात तेव्हा काय काढलं होतंत ?’ असं ट्विट करत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला. एवढंच नव्हे तर ‘लबाड लांडगं ढोंग करतंय’ असा हॅशटॅगही जोडत त्यांनी उद्धव यांच्यावर खोचक टीका केली.
तर राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंना थेट शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. उद्धव ठाकरेंनी केलेला ‘बिन शर्ट’ पाठिंबा हा विनोद समजायलाच 10 मिनिटं लागली. वरळीत राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. तेव्हा पाठिंबा घेऊन मुलाला आमदार केलं. तेव्हा त्यांना काही वाटलं नाही का ? असा सवाल विचारत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. येत्या काळात मनसे वि शिवसेना ठाकरे गटातील वाक् युद्ध आणखी रंगू शकते.