मराठा आरक्षणावरुन राज ठाकरे कडाडले, जरांगेचं नाव घेत म्हणाले…
"महाराष्ट्रासाठी असं धोरण आखायला गेले तर प्रत्येक राज्यातील जाती उठतील. ते कुणालाही परवडणार नाही. हे होणार नाही हे सर्वांना माहीत आहे", असे राज ठाकरे म्हणाले
Raj Thackeray On Maratha Reservation : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु होताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही सध्या अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. मनसेने संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी उमेदवार घोषित केले आहेत. त्यातच आता लातूरमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले.
मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईत आला होता. राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाले. इतके शिस्तबद्ध मोर्चे मी इतिहासात पाहिले नाही. राजकीय पक्ष फक्त मराठा आरक्षणाच्या भूलथापा देत आहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही, असे स्पष्ट विधान राज ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचाही उल्लेख केला.
अजूनपर्यंत आरक्षण का मिळालं नाही?
“मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईत आला होता. त्याच मोर्चाला सामोरे कोण कोण गेले होते. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोकं होते. विधीमंडळ अधिवेशन सुरू होतं. सर्वांनी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ सांगितलं. मग अडवलं कुणी होतं. मग आतापर्यंत का नाही दिलं. कधी यांची तर कधी त्यांची सत्ता आली. या गोष्टीला २० वर्ष झाली. इतक्या वर्षात फक्त तुम्हाला झुलवत ठेवलं. राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाले. इतके शिस्तबद्ध मोर्चे मी इतिहासात पाहिले नाही. कोणी पुढारी नव्हता. पण सर्व जिल्ह्यातून मोर्चे शिस्तबद्ध निघाले. त्या मोर्चांचं काय झालं. का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं”, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.
“राजकीय पक्ष फक्त भूलथापा देतात”
“मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात निवडणूक लढवू. नंतर म्हणतात नाही लढणार. पाडणार. तुम्हाला लढायचं तर लढा नाही तर नका लढू. प्रश्न एवढाच आहे की, आरक्षण कसं देणार ते सांगा. हे फक्त तुम्हाला झुलवत आहेत. राजकीय पक्ष फक्त भूलथापा देत आहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी फक्त सत्य परिस्थिती मांडतो”, असे राज ठाकरेंनी म्हटले.
“मी जरांगे पाटलांना भेटलो तेव्हा त्यांच्यासमोर मांडली. हा टेक्निकल विषय आहे. किचकट आहे. लोकसभेत कायदा बदलावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश घ्यावे लागेल आणि हा फक्त राज्याचा विषय नाही. महाराष्ट्रासाठी असं धोरण आखायला गेले तर प्रत्येक राज्यातील जाती उठतील. ते कुणालाही परवडणार नाही. हे होणार नाही हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना माहीत आहे. आरक्षण देणार जे सांगतात त्यांना विचारा आरक्षण कसं देणार”, असेही राज ठाकरे म्हणाले.