अमित ठाकरे, आदित्य ठाकरे नाही तर राज ठाकरेंनीही लढवलेली निवडणूक; कधी, कुठे, केव्हा, निकाल काय होता? जाणून घ्या किस्सा
ठाकरे कुटुंबातील दोन सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत.
Raj Thackeray Fight Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकीकडे सर्वच पक्ष उमेदवार घोषित करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे नावाची घोषणा झालेले उमेदवार हे घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे कुटुंबातील दोन सदस्य सातत्याने चर्चेत आहेत. त्यातील पहिला सदस्य म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे आणि दुसरा म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे. सध्या आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
पण तुम्हाला माहितीये का राज ठाकरे यांनीही एकेकाळी निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्यात ते विजयी झाले होते. बसला ना धक्का… पण हे खरं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: हा किस्सा सांगितला आहे. राज ठाकरे यांनी नुकतंच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना निवडणुकांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर भाष्य करताना त्यांनी सहजपणे हा किस्सा सांगितला.
राज ठाकरे निवडणुकीचा किस्सा सांगताना काय म्हणाले?
“मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी माझ्या आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नाही. फक्त एकदाच कॉलेजमध्ये असताना मी आयुष्यात निवडणूक लढवली. क्लास रेप्रिझ़ेन्टटिव्ह् (Class Representative) साठीची ती निवडणूक होती. जे. जे स्कूल ऑफ आटर्समध्ये आमचे दोन वर्ग असायचे. त्यावेळी मी त्या निवडणुकीसाठी उभा राहिलो होतो. माझ्याविरुद्ध हा (कुणाल विजयकर) उभा राहिला होता.
मी जे एकमेव निवडणूक लढवली ती मी जिंकलो. त्यावेळी असा नियम होता की, या निवडणुकीत कोणीही जिंकलं, कोणीही हरलं तरी त्यानंतर होणारी पार्टी ही सर्वांसाठी समान असायची. त्यामुळे त्या जिंकण्या आणि हरण्याला काही अर्थ नव्हता. सगळे संध्याकाळी सांडलेले असायचे”, असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.
ठाकरे कुटुंबातील दोन सदस्य निवडणुकांच्या रिंगणात
राज ठाकरेंनी हा किस्सा सांगितल्यानंतर तिथे उपस्थितीत त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, सून यांसह कुटुंबातील सर्व मंडळी जोरजोरात हसू लागली. दरम्यान सध्या राज्यातील निवडणुकांचे वातावरण आहे. महाविकासआघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगताना दिसणार आहे. त्यातच ठाकरे कुटुंबातील दोन सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. ते माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. त्यामुळे सध्या वरळी आणि माहीम या दोन्हीही मतदारसंघांकडे दिग्गजांचे लक्ष लागले आहे.