राजकारण्यांना खडेबोल सुनवा… साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे यांनी टोचले कान
मराठी साहित्य वाढवण्यासाठी जी गरज लागेल त्यावेळी आम्ही आहोतच. अन्यथा आम्हाला ऐकायला बोलवावं. बोलायला बोलू नये, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.
Raj Thackeray Pune Speech : “मी आजवर जे काही बोललो, भाषण केलं, सोशल मीडियावर त्यावर काय बोललं जातं ते मी कधी वाचत नाही. त्या भानगडीत पडत नाही”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. नुकतंच पुण्यात मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरेंनी दमदार भाषण केले.
“साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं”, राज ठाकरेंचा मिश्किल सवाल
“माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण आज करणार आहे. साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं. आम्ही त्यांची भाषण वाचून पुढे जातो, तेव्हा त्यांच्यासमोर बोलायचं नसतं. फक्त ऐकायचं असतं. मला वाटतं की हे फोटोच काय ते सांगत आहे. महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्राचं वेगळेपण काय आहे, इतर राज्यांपेक्षा काय आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.
“साहित्यिकांच्या कार्यक्रमाला बोलायला बोलू नये”
“साहित्यिकांच्या कार्यक्रमाला मला बोलावलं. अशा ठिकाणी आमची काय गरज असते. मराठी साहित्य वाढवण्यासाठी जी गरज लागेल त्यावेळी आम्ही आहोतच. अन्यथा आम्हाला ऐकायला बोलवावं. बोलायला बोलू नये. राज्यातील साहित्यिक, कवी पाहत आलो, तो मराठी बाणा म्हणतो तो प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा, योग्यवेळी जे ठणकावून सांगणे, राजकारण्यांना, बिघडलेल्या सांस्कृतिक आणि इतर गोष्टींना ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत होती, ती आज कमी दिसतेय असं वाटतं”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.
“जमिनीवर आणणं, शिकवणं सांगणं हे तुमचं कर्तव्य”
“महाराष्ट्राचा झालेला खेळ, राज्याची सर्कस झाली आहे. महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहेत. राज्यात कित्येक लोक राजकारणात आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावली पाहिजे. राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ज्या गोष्टींचं धरबंधन नाही अशा गोष्टी होतात तिथे त्यांना कानधरून जमिनीवर आणणं, शिकवणं सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे असं वाटतं. तुम्ही त्या अधिकारवाणीने बोलू शकता, सांगू शकतो. आम्ही बोललो तर ट्रोल होतो असा विचार करू नका. मी आजवर जे काही बोललो, भाषण केलं, सोशल मीडियावर त्यावर काय बोललं जातं ते मी कधी वाचत नाही. त्या भानगडीत पडत नाही”, असेही राज ठाकरे म्हणाले.