ही निवडणूक किचकट, राज साहेब चिंतन करत असतील, कोणता नेता म्हणाला ?
लोकसभेच्या रणधुमाळीत सर्व पक्षांची तयारी सुरू आहे, मनसे मात्र शांत आहे, अशी चर्चा आहेत. त्यावर ते म्हणाले, ' आम्ही शांत नाही, मात्र निवडणुकीबाबत राज ठाकरे हे पाडव्याच्या सभेत निर्णय जाहीर करतील
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पहिल्या टप्प्याचे मतदान होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत पण या रणधुमाळीत मनसेचा कुठेच पत्ता दिसत नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं. मात्र आता मनसे आणि राज ठाकरे दोघेही ॲक्टिव्ह झाले असून येत्या 9 तारखेला, गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा होणार आहे. ही निवडणूक किचकट आणि गुंतागुंतीची आहे, त्यामुळे राजसाहेब याबाबत चिंतन करत असतील, राजसाहेब जेंव्हा शांत असतात तेंव्हा जास्त चिंतन करत असतात, असे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केले.
9 तारखेला शिवाजी पार्कवर मनसेने गुढी पाडव्याचं आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचबद्दल मनसे नेते प्रकाश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेच्या रणधुमाळीत सर्व पक्षांची तयारी सुरू आहे, मनसे मात्र शांत आहे, अशी चर्चा आहेत. त्यावर ते म्हणाले, ‘ आम्ही शांत नाही, मात्र निवडणुकीबाबत राज ठाकरे हे पाडव्याच्या सभेत निर्णय जाहीर करतील. 14 जागा जरी निघून गेल्या तरी 34 जागा शिल्लक असतील, पक्षाने निर्देश दिले आहेत की याबाबत फक्त राजसाहेब निर्देश देतील. ‘
राजसाहेब शांत असतात तेव्हा
मध्यंतरी राज ठाकरे दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शाह यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा झाली. नंतर मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी राज यांची चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे पुन्हा राजकीय चर्चांमध्ये दिसले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबद्दलचा सस्पेन्स वाढलेला आहे. मनसेची भूमिका नक्की काय याबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे. त्यावरही महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं.
‘जनतेत संभ्रम नाही प्रसार माध्यमात संभ्रम आहे, आम्ही सगळीकडे फिरतो, ही निवडणूक मोठी किचकट आणि गुंतागुंतीची आहे, त्यामुळे राजसाहेब याबाबत चिंतन करत असतील, राजसाहेब जेंव्हा शांत असतात तेंव्हा जास्त चिंतन करत असतात ‘ असे ते म्हणाले. अमित शहा आणि राज साहेब यांची झालेली भेट ही उच्च पातळीवरची आहे. याबाबत आम्हाला काही कळवलं नाही, पण काहीतरी सकारात्मक चर्चा झाली असेल, ती योग्य वेळी बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 9 तारखेला राजसाहेब काय बोलतील याची उत्सुकता मला पण आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस मोडकळलीला आलेलं घर
लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच काँग्रेसला एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आहेत. अनेक मोठे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. यावर बोलताना महाजन यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. ‘ काँग्रेस हे मोडकळीस आलेलं घर आहे. काँग्रेस मधून बाहेर पडण्यासाठी गर्दी होत आहे. काँग्रेसचे दार चिंचोळे आहे त्यामुळे तिकडे बाहेर पडताना चेंगराचेंगरी सुरू आहे. दारुण पराभव होऊ नये यासाठी उभं राहायला कुणी तयार नाही’ असं ते म्हणाले.
गुढी पाडव्याला राज ठाकरेंची तोफ धडाडणार
राज ठाकरे यांनी मध्यंतरी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांशी युतीची बोलणी केली. शिवाय पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी प्रत्यक्षपणे युतीच्या राजकारणाला सुरुवातही केली होती. अमित शाह यांच्या भेटीनंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी मनसेकडून युतीकडे तीन जागांची मागणी करण्यात आली होती, अशी चर्चा आहे. मात्र, त्यानंतर पुढे काहीच घडलं नाही. युतीच्या बैठकाही झाल्या नाहीत. राज ठाकरे यांनीही मीडियासमोर येऊन काहीच भाष्य केलं नाही. त्यामुळे दिल्लीत आणि मुंबईत काय घडलं याबाबत राज ठाकरे गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या भाषणाकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे 9 तारखेला कुणावर बरसतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, राज ठाकरे यांची भाजपवरील टीकेची धार कमी झालेली दिसेल. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर राज ठाकरे अधिक हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेही त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागलं आहे.