भाजप-शिवसेना युतीसाठी थेट मोहन भागवतांची मध्यस्थी?
मुंबई : भाजप आणि शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. युतीचा 23 – 25 चा अंतिम फॉर्म्युला बनला आहे. पण मतदारसंघाचा तिढा कायम आहे. शिवसेनेला भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ हवा आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजपचा खासदार आहे. त्यामुळे युतीवर शिक्कामोर्तब होण्यात अडथळा निर्माण झालाय. पण युतीबद्दल मीडियाला घाई झाली आहे. […]
मुंबई : भाजप आणि शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. युतीचा 23 – 25 चा अंतिम फॉर्म्युला बनला आहे. पण मतदारसंघाचा तिढा कायम आहे. शिवसेनेला भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ हवा आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजपचा खासदार आहे. त्यामुळे युतीवर शिक्कामोर्तब होण्यात अडथळा निर्माण झालाय. पण युतीबद्दल मीडियाला घाई झाली आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या निलम गोर्हे यांनी टिव्ही 9 ला दिली.
युतीचा लोकसभा निवडणुकीचा अंतिम फॉर्म्युला 23-25 असा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात शिवसेनेने 2014 ला हातकणंगले मित्रपक्ष राजू शेट्टी यांना सोडला होता आणि सातारा अपक्ष उमेदवाराला सोडला होता. त्यामुळे शिवसेना या दोन्ही मतदारसंघात आपला उमेदवार लढवण्यासाठी आग्रही आहे. तर भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ शिवसेनेने मागितल्याने युतीत जागा वाटप फॉर्म्युल्यात तिढा निर्माण झाला आहे. भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे चर्चेत संवाद फक्त फॉर्म्युला मांडण्यापुरता होत असल्याचं बोललं जात आहे.
याचवेळी भाजपने 2014 मध्ये माढा मतदारसंघातून सदाभाऊ खोत आणि बारामतीत महादेव जानकर यांना आपल्या कोट्यातून मतदारसंघ दिले होते. भाजपच्या या मित्रपक्षांची जबाबदारी घेण्यास शिवसेना तयार नाही. भाजपच्या मित्रपक्षात रामदास आठवले, नारायण राणे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे मित्रपक्षासाठी भाजपला शिवसेनेबरोबर युती करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या युतीसंदर्भात भाजप आणि शिवसेनेचे नेते सावध प्रतिक्रिया देत आहेत.
राज्यसभेची एक जागा अधिक देण्याची भाजपने ऑफर दिल्याचं बोललं जातंय. पण यावरही प्रतिक्रिया देण्यास शिवसेनेने नकार दिलाय. त्यामुळे युतीसाठी थेट संघाची मध्यस्थी सुरु झाल्याचं बोललं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत युतीची चर्चा अडकून आहे. त्यामुळे मतांची विभागणी टाळण्यासाठी आता थेट राष्ट्रीय स्वयंवसेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीच मध्यस्थी करण्याचा पुढाकार घेतला आहे.