‘उद्धव ठाकरे यांचे फ्रंट मॅन अनिल जयसिंघानी यांना अटक, जो लोग दुसरे के लिए गड्डा खोदते है….’ मोहित कंबोज यांचं ट्विट काय?
राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जे नाव चर्चेत होतं, त्या अनिल जयसिंघानीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना इशारा दिलाय.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणातील बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला आज मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. गेल्या काही दिवसांपासून अनिल जयसिंघानी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. एवढ्या वर्षांपासून फरार आरोपीला नेमकं कोण पोलीस संरक्षण देत होतं, अनिल जयसिंघानी आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ठाकरे आणि अनिल जयसिंघानी यांचे नेमके काय संबंध आहेत, यावरून चर्चांना उधाण आलंय. यातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा इशारा दिलाय. उद्धव ठाकरे यांचे फ्रंट मॅन अनिल जयसिंघानी याला अटक, अशा शब्दात कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
कंबोज यांचं ट्विट काय?
भाजप नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना इशारा देत म्हटलंय, उद्धव ठाकरे यांचे फ्रंट मॅन अनिल जयसिंघानी यांना अटक झाली आहे. लवकरच माजी पोलीस आयुक्त संजय पांडे तसेच आणखी एका पोलिस अधिकाऱ्याची पोलखोल होणार आहे. त्यांचं काऊंटडाऊन सुरु झालंय, असा इशारा मोहित कंबोज यांनी दिलाय. तसेच यासोबत त्यांनी दोन ओळीदेखील लिहिल्या आहेत. जो लोक दुसरे के लिए गड्डा खोदते है, वह खुद एक दिन उसी गड्डे में गिर जाते है..
Uddhav Thackrey Front Man Bookie Anil JaiSinghani Arrested By Mumbai Police !
Ex CP Sanjay Panday and One Ex CP Count Your Days ,U All Will Be Exposed Soon !
जो लोग दूसरे के लिए गड्ढा खोद्ते है, वह खुद एक दिन उसी गड्ढे में गिर जाते हैं …..
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) March 20, 2023
मोहित कंबोज यांनी आधीदेखील उद्धव ठाकरे यांचा अनिल जयसिंघानी यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला होता. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांना अडकवण्यासाठी मागील सरकारने काय सापळा रचला होता, याची लवकरच चौकशी होईल, असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला होता. तसेच उद्धव ठाकरे ,संजय पांडे, अनिल जयसिंघानी यांचे नेमके काय कनेक्शन आहे, याचीही चौकशी होईल, असे सूतोवाच कंबोज यांनी केले आहे. २०१४ मध्ये अनिल जयसिंघानी याने शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अनिल जयसिंघानी- शिवसेना कनेक्शन काय?
अमृता फडणवीस यांना अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने १ कोटी रुपयांच्या लाचेचं अमिष दाखवल्याची तक्रार दाखल झाली आहे. वडील अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हेगारी प्रकरणं दडपण्याकरिता ही लाच दाखवण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं गेलं आहे. अनिल जयसिंघानी अनेक वर्षांपासूनच फरार क्रिकेट बुकी असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे पोलिसात दाखल आहेत. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणात अनिल जयसिंघानी याचं नाव आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. २०१४ मध्ये अनिल जयसिंघानी याने शिवसेनेत प्रवेश करतानाचे हे फोटो असल्याचा दावा केला जातोय. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावरून पलटवार केलाय.
यावेळी ठाण्याचे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे होते. त्यांच्या परवानगीनेच अनिल जयसिंघानी यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला अडकवण्याचे प्रयत्न वारंवार करण्यात आले, असे दावे केले आहेत. त्या दाव्यांचा आणि अनिल जयसिंघानी- उद्धव ठाकरे यांचा काही संबंध आहे का, यावरून आडाखे बांधले जात आहेत.