…अन् जालन्यात लाडक्या भावाला आले 7 हजार 500 रुपये, चूक लक्षात येताच पैसे केले परत
जालना जिल्ह्यातल्या जळगाव सोमनाथ येथील रहिवासी असलेले विलास भुतेकर यांचं आधाकर कार्ड नजर चुकीने त्यांच्या पत्नीचा अर्ज भरताना त्याला लिंक झालं. त्यानंतर त्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील जमा झाले.
आडीच लाखांपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर लगेचच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलैमध्ये महिलांच्या खात्यात दीड हजारांचा पहिला हफ्ता जमा करण्यात आला. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे एकूण पाच हफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत जमा करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हफ्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता जालन्यातून एक बातमी समोर आली आहे.
जालन्यामध्ये लाडक्या बहिणीचा हफ्ता हा लाडक्या भावाच्या खात्यात जमा झाला. मात्र त्याने देखील प्रामाणिकपणा दाखवत ही रक्कम परत केली आहे. या लाडक्या भावाचं यासाठी कौतुक करण्यात येत आहे. पत्नीच्या अर्जाला नजरचुकीने स्वतःचे आधार लिंक झाल्यानं हे पैसे पतीच्या खात्यात जमा झाले होते.
जालना जिल्ह्यातल्या जळगाव सोमनाथ येथील रहिवासी असलेले विलास भुतेकर यांचं आधाकर कार्ड नजर चुकीने त्यांच्या पत्नीचा अर्ज भरताना त्याला लिंक झालं. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे 7 हजार 500 रुपये जमा झाले. दरम्यान हे पैसे त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या खात्यात आलेली लाडक्या बहिणीची रक्कम बाल कल्याण विभागाकडे दिली. याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.
एकीकडे ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेच्या नावाखाली अनेकांनी शासनाची फसवणूक केल्याच्या बातम्या येत आहेत. अनेकांनी चुकीचं आधार लिंक करून लाडक्या बहिणींना आलेले पैसे आपल्या खात्यात जमा केले. मात्र विलास भुतेकर यांनी हा प्रकार नजर चुकीने झाला असताना देखील आपल्यात खात्यात आलेली रक्कम पुन्हा वापस केली आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना चुकीचा आधार क्रमांक लिंक झाल्यानं हा घोळ झाल्याचं त्यांनी म्हटलं.