Monsoon Update : मान्सूनचं…दिसला ग बाई दिसला…ते शोधू कुठं…किती दिवस लांबणीवर? वाचा
केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासही वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त वेळ लागताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातही मान्सून उशीरा दाखल होणार आहे. आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होईल? याची अंदाजे तारीख हवामान खात्यानंही सांगितलेली आहे.
मुंबई : यंदा मान्सून (Monsoon Update) लवकरात लवकर दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. या बातमीने बळीराजा (Farmers) आभाळाकडे डोळे लावून बसलेला. 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल या आशेवर शेतकरी होते. मात्र यंदाचा मान्सून लांवणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण तुर्तास तरी मान्सूनचा वेग मंदावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (Monsoon In Maharashtra) चिंता काहीशी वाढली आहे. तळकोकणासह मुंबईतई मान्सून दहा जूनच्या आसपास पोहोचले अशी शक्यता आधी हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र सध्या तरी तसे चित्र दिसत नाही. कारण केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासही वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त वेळ लागताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातही मान्सून उशीरा दाखल होणार आहे. आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होईल? याची अंदाजे तारीख हवामान खात्यानंही सांगितलेली आहे.
के. एस होसाळीकर यांचं ट्विट
IMD च्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे pic.twitter.com/cfLlPmuGq2
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 4, 2022
यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज
यंदा राज्यसह देशात चांगला पाऊस पडेल, साधारणता यंदा देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चांगला पाऊस पडल्यास सहाजिकच राज्यातली सर्व धरणं तुडुंब भरतली आणि त्याचा फायदा पुढे पाणी पुरवठ्यास होणार आहे. मात्र त्यासाठी हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे चांगला पाऊस पडण्याची गरज आहे. सध्या मान्सूनपूर्व पावसाचे काही ठिकाणी आगमन झाले आहे. मात्र यामुळे उकाडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उकाड्याने सध्या देश हैराण झाला आहे. त्यामुळे मान्सून लवकरात लवकर दाखल व्हावा असे प्रत्येकालाच वाटत आहे.
शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी
यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज हवामान ख्यात्याने वर्तवला होता, त्यामुळे दुसरीकडे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली होती. शेताच्या मशागतीची कामेही हाती घेण्यात आली होती. तसेच बी बीयाणे आणि खतांची जुळवाजुळवही सुरू केली होती. मात्र मान्सूनलाच उशीर होत असल्याने शेतकऱ्यांना आता आणखी काही दिवस तरी पेरणीसाठी वाट पाहवी लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पावसांच्या आशेवर बसला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकासान झालं आहे. त्यात अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ ही संकट तर शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली आहेत. त्यामुळे यंदाच्या मान्सूनकडून बळीराजाला अनेक अपेक्षा आहेत.