धक्कादायक ! राणीच्या बागेत वर्षभरात 47 प्राण्यांचा मृत्यू, ‘या’ कारणामुळे अनेकांनी गमावले प्राण
दक्षिण मुंबईतील वीर जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात राणीच्या बागेत तब्बल 47 प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यापैकी तब्बल 30 प्राण्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समजते.
मुंबई | 19 मार्च 2024 : दक्षिण मुंबईतील वीर जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात राणीच्या बागेत तब्बल 47 प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यापैकी तब्बल 30 प्राण्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यामुळे उद्यानातील प्राण्यांच्या देखरेखीवर आणि सोयी-सुविधांबाबत प्राणी प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
देशभरातील प्राणिसंग्रहायलयातील पक्षी आणि प्राणी यांच्याबाबतचा अहवाल नुकताच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये २०२२-२३ या वार्षिक अहवालात कोणत्या प्राण्यांचा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये राणीच्या बागेतील काही प्राण्यांचा मृत्यू हा हृदयविकाराचा धटका, श्वसनक्रिया बंद होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यामुळे झाल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.
यामुळे झाला मृत्यू
1 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान येथील 47 प्राणी आणि 29 पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापैकी 30 जणांचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झाला. प्राणी संग्रहालयात पेंग्विन, वाघ, पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर इत्यादी प्रकारचे 13 जातींचे 84 सस्तन प्राणी, विविध पक्षी आहेत. मृत प्राण्यांमध्ये ठिपके असलेले हरीण, इमू, मॅकाक रीसस, सांबर, आफ्रिकन पोपट, कासव यांचा समावेश आहे.
या पक्ष्यांचाही मृत्यू
तसेच पोपट आफ्रिकन ग्रे, कॉकॅटियल बडेरिगर, सांबर हरण, बडेरिगर, मॅकॉ मिलिटरी, तीतर गोल्डन, भारतीय फ्लॅपशेल, कासव, गोल्डन जॅकल, इमू इत्यादींचाही समावेश आहे. वृद्धापकाळाने सर्वात कमी मृत्यू झाले आहेत. मात्र सर्वाधिक प्राण्यांचा मृत्यू या कारणांमुळे का होत आहे याची कारणमीमांसा अद्याप झालेली नाही.
राणीच्या बागेतील पेंग्विनची फॅमिली वाढली
दरम्यान राणीच्या बागेतील प्रमुख आकर्षण असलेल्या पेंग्विनची संख्या वाढत असल्याने त्यांच्या घराचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पेंग्विनच्या घराला 18 पेंग्विनच्या रहीवासासाठी मोठे करण्याची योजना आहे. यासाठी अत्याधुनिक टनेल ॲक्वेरियम देखील बांधले जाणार आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या एक्वेरियममध्ये तीन नर आणि पाच मादी पेंग्विनना दक्षिण कोरीयातील सेऊल येथून आणण्यात आले होते. गेल्या सात वर्षांत त्यांची संख्या 18 झाली आहे. त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते.