खासदार अमोल कोल्हे यांची नाराजी काय? राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीला उपस्थित न राहण्याबद्दल कोल्हे यांची भूमिका काय?
मुंबई आज होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीला अमोल कोल्हे हे उपस्थित नसल्याने अमोल कोल्हे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे हे नाराज असल्याचे बोललं जात आहे. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिरालाही अमोल कोल्हे यांनी नाराजी दर्शविली होती. त्यानंतर गुजरात निवडणुकांत जी स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर केली होती त्यातही अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यामुळे अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात काही आलबेल नाही या चर्चेला दुजोरा मिळाला होता. त्यातच अमोल कोल्हे यांची आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींची जवळीक चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नाराज आहेत का? अमोल कोल्हे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? इतकंच काय अमोल कोल्हे हे राजकारणातूच बाहेर पडणार का? इथपर्यंत चर्चा होऊ लागल्या होत्या. या चर्चा काही काळ थांबल्याही होत्या पण पुन्हा आज मुंबईत होत असलेल्या बैठकीला सर्वच खासदार आणि महत्वाचे नेते उपस्थित असतांना अमोल कोल्हे मात्र त्या बैठकीला हजर नाहीत.
त्यामुळे अमोल कोल्हे हे नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर आहेत का? अशीही चर्चा होऊ लागली आहे.
परंतु अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगात व्यस्त आहे. दोन दिवसांपासून अमोल कोल्हे नाशिकमध्ये आहे.
मात्र, काही महिन्यांपूर्वी अमोल कोल्हे यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्या चित्रपटाच्या दरम्यान अमोल कोल्हे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.
त्यानंतर अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाला स्वतःच्या पक्षाने प्रतिसाद न देता त्याचे प्रमोशन केले नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यामध्ये फारसा रस घेतला नाही.
आणि हीच बाब अमोल कोल्हे यांना पटलेली नाही, त्यामुळे अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अमोल कोल्हे सारखा नेता राष्ट्रवादीमधून गेल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2019 च्या निवडणुकीत मातब्बर नेत्याचा अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता, अभिनय करून घराघरात पोहचलेल्या अमोल कोल्हे यांना मतदारांनी डोक्यावर घेतले होते.
इतकंच काय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक यादीमध्ये अमोल कोल्हे यांचे नाव अग्रस्थानी होते, त्यामुळे अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे समीकरण शिरूर मधील जनतेने स्वीकारलं होतं.
मात्र, सध्याच्या हालचाली पाहता अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नाराज आहेत, हे स्पष्ट आहे, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही वरिष्ठ पातळीवरुन केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यातच नाशिकमध्ये असलेल्या अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला गैरहजर राहण्याबाबत बोलण्यास नकार दिल्याने कोल्हे यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे.