कोल्हापूरः बराच विचार करून मी मतदान केले. जवळपास तीस सेकंद विचार केला. माझ्या खासदारचीकी मुदत तीन मेपर्यंत संपतेय. त्या दिवशी मी माझी दिशा जाहीर करणार असून, ती निश्चितच वेगळी असेल, असे सुतोवाच खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) छत्रपती यांनी आज कोल्हापुरात केले. त्यामुळे राजे नेमकी कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ते राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस, शिवसेना यांच्यापैकी एखादा पक्ष निवडणार की, भाजपला (BJP) जवळ करणार की, स्वतः एखाद्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार हे पाहावे लागेल. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून लाखो जनसमुदाय असलेले मोर्चे अगदी शांततेत निघाले. त्यांच्या या आंदोलनाने उभ्या महाराष्ट्राला शांततामय निदर्शनाची ताकदही दाखवून दिली. त्यांच्या मागे सारा समाज एकवटून उभा राहिला. आजही राहतो. त्यामुळे राजे नेमकी काय भूमिका घेणार, याचे वेध साऱ्यांनाच लागलेत.
मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनावेळी कोल्हापूरच्या राजांच्या डोळ्यांतून अश्रू निघाले होते. त्या अश्रूंचा वचपा कोल्हापूरकर काढतील, असे वक्तव्य भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केले होते. त्यावर बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे माझ्या सोशल गोष्टीवर कोण, कसे भाष्य करेल हे सांगता येत नाही. कोण काय बोलावे, यावर मी सांगणार नाही. मी प्रामाणिक काम करत असतो. तीन मेपर्यंत माझा खासदारकीचा काळ आहे. त्यानंतर मी माझी दिशा जाहीर करणार आहे. निश्चितच माझी वेगळी दिशा असणार आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
संभाजीराजे छत्रपती राजकारणात पुढे काय पाऊल टाकणार यावर बरेच काही अवलंबून आहे. संभाजीराजेंचे संघटन कौशल्य उत्तम आहे. त्यांच्या एका हाकेवर लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला हे आपण मराठा आरक्षण आंदोलनात पाहिले. त्यांच्या शब्दालाही एक मान आहे. आता ते एखाद्या राजकीय पक्षात जाहीरपणे सहभागी झाले, तर आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलाचे शिंतोडे थोडे का होईना त्यांच्यावर उडणारच. सोबतच ते जिकडे असतील, ते पारडेही जड होणार. हे पाहता राजे काय भूमिका घेणार? एखाद्या राजकीय पक्षात रितसर सहभागी होणार की नवा पक्ष स्थापणार हे पाहावे लागेल.