संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर पहिला दौरा कुठं करणार, पदाधिकारी लागले कामाला
संजय राऊत यांच्या भेटीसाठी यावेळी माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे, राजेंद्र देसाई यांनी गुलाबाच्या फुलांचा मोठा हार देऊन त्यांचे स्वागत केले.
मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांना बुधवारी जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांना मुंबईत भेटण्यासाठी राज्यातील अनेक पदाधिकारी आणि नेते भेटीसाठी जात आहे. त्याचपार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक पदाधिकारी संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी राऊत यांची विचारपूस करत असतांना नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना राऊत यांनी नाशिकमध्ये काय सुरू आहे ? अशी विचारणा केली होती. त्यावर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थित आहे. काही छोटे कार्यकर्ते गेले आहेत, ते अजून छोट्या कार्यकर्त्यांना ओढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आपली संपूर्ण टीम आपल्यासोबत कायम असल्याचा विश्वास नाशिकच्या पादधिकाऱ्यांनी दिला आहे. खरंतर संजय राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची संपर्क प्रमुखाची जबाबदारी आहे. त्यामुळे नाशिकमध्ये संजय राऊत यांचे सर्वाधिक दौरे होत असतात.
अटक होण्यापूर्वी संजय राऊत यांचा काही दिवस अगोदर नाशिकमध्ये दौरा झाला होता. त्यातच आता जामीन झाल्यानंतर पहिला दौरा नाशिकला करण्याची इच्छा त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान व्यक्त केली आहे.
यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले आहे, शिवसेनेच्या विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, मार्गात अडथळे आणले तरी शिवसेना आपल्या मार्गाने खंबीरपणे चालत राहील. हाच आजवरचा इतिहास आहे.
त्यात काहीही बदल होणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखावी लवकरच पक्षाला आधीपेक्षाही अधिक चांगले दिवस येतील, याबाबत मला काहीही शंका नाही असंही राऊत म्हणाले आहे.
संजय राऊत यांच्या भेटीसाठी यावेळी माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे, राजेंद्र देसाई आदी गुलाबाच्या फुलांचा मोठा हार देऊन त्यांचे स्वागत केले.
शुभेच्छा देत नाशिकची शिवसेना भक्कम असून पहिला दौरा नाशिकलाच करा असाही आग्रह या पदाधिकऱ्यांनी केला आहे. नाशिकमध्ये शिवसेना भक्कम राहिल्याने विरोधकांचीच झोप उडाली आहे असाही दावा पदाधिकऱ्यांनी केला आहे.