कडेलोट कुणाचा होणार? उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकमेकांत भिडले
भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट पॉइंट वरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकला नाही तर त्यांनी उडी मारावी असं आव्हान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना दिलं आहे.
सातारा : साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले(MP Udayanaraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले( MLA Shivendraraje Bhosale) यांच्यातील वाद आता थेट अजिंक्यतारा किल्ल्यावरील कडेलोट पॉइंट वर जाऊन पोहचला आहे. भ्रष्टाचाराऱ्याच्या मुद्द्यावरुन कडेलोट पॉइंट वरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकला नाही तर त्यांनी उडी मारावी असं आव्हान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना दिलं होतं. याला शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
मिशीला पीळ आणि ताव मारून काहीही होत नसतं असं म्हणत शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. नगरपालिका निवडणुकीत उदयनराजेंचा कडेलोट होईल असा दावा देखील शिवेंद्रराजे यांनी केला आहे.
सातारा नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे साताऱ्याच्या दोन्ही राजे पुन्हा एकदा एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.
सातारा नगरपालिकेच्या विकास कामांच्या मुद्द्यावरून दोन्ही राजांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सातारा नगरपालिका सध्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीच्या ताब्यात आहे. उदयनराजे यांच्या हातातून सत्ता खेचून आपल्याकडे आणण्यासाठी शिवेंद्रराजे यांनी देखील कंबर कसली आहे.
सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या कामाला सुरुवात झाली असून याची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीने मागील काळात सत्ता असताना कोणतेही काम न केल्याचा गंभीर आरोप केला.
माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत. असे सांगत जर भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट पॉइंट वरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकला नाही तर त्यांनी उडी मारावी असं आव्हान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना दिलं आहे.
शिवेंद्रराजे यांनी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकत हिंमत असेल मी बोललेल्या गोष्टींना उत्तर द्या फक्त मिशीवर हात फिरवून काही होत नसतं अशी टीका केली. 50 नगरसेवक सातारा विकास आघाडीचे येणाऱ्या निवडणुकीत निवडून येतील असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.
माझी सुरुवात नगरसेवक पदापासून झाली आहे तुमच्या सारखा मी आमदार झालेलो नसल्याची खोचक टीका देखील उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर केलीय आहे.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर दिलेय. आमचे नगर विकास आघाडीचे 50 नगरसेवक निवडून येतील. निवडणूक झाल्यावर त्यांना समजेल असं ते म्हणालेत.
सातारा विकास आघाडी धोक्यात आल्याने नैराश्यातून बिनगुडाचे आरोप केले जात आहेत. नगरपालिका निवडणुकीत 50 नगरसेवक निवडून आणण्याची गॅरंटी आहे. निवडणुकीत त्यांचा शंभर टक्के कडेलोट होणार हे नक्की असे सडेतोड उत्तर आमदार शिवेंद्रराजे यांनी दिले आहे.
साताऱ्यातील कास धरणाची उंची, ग्रेड सेपरेटरचे काम, बंदिस्त गटार योजना अशी अनेक शहरातील विकास काम सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेत झाली असल्याचे खासदार उदयनराजे म्हणाले. तर, आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील या कामांना खासदार उदयनराजे भोसले यांनी किती पाठपुरावा केला याचा त्यांनी खुलासा करावा असे विधान केले. या विकास कामांमध्ये आम्ही देखील पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणाले. यामुळे साताऱ्यात सध्या दोन्ही राजेंमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यापुढील काळात सातारकर नेमका कोणाला कौल देतील हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.