नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळेल; ठाकरे गटाच्या नेत्यानं विश्वासानं सांगितलं…
पुन्हा एकदा खासदार विनायक राऊत यांच्याकडून त्यांना आव्हान देण्यात आल्याने राणे-ठाकरे गट वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिंधुदुर्गः महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात असल्यापासून ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि राणे पितापुत्रांकडून आरोप प्रत्यारोप केला जात आहे. काही दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या राजन साळवी या नेत्यानेही नारायण राणे यांनी कोकणातून लोकसभेसाठी उभा राहून दाखवावे असं जाहीर आव्हान दिले होते.
त्यानंतर आता पुन्हा एकदा खासदार विनायक राऊत यांच्याकडून त्यांना आव्हान देण्यात आल्याने राणे-ठाकरे गट वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे जर माझ्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा अडीच लाख मतांनी पराभव करणार असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
यावेळी विनायक राऊत यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
सिव्होटर्सचा सर्व्हे नेहमी सत्य असतो असे म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजवटीला जनता कंटाळली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांचे सरकार औट घटकेचे असून भाजपच त्यांचे विसर्जन करणार असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला आहे.
नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना विनायक राऊत यांनी राणे यांच्या जवळच्या माणसाने तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत नारायणे राणे यांचा मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
तर संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वादाबद्दल बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयम पाळण्याची आवश्यकता असल्याचे ही विनायक राऊत म्हणाले.
खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली असल्याने आगामी काळात राणे आणि राऊत यांच्या वाद विकोपाला जाण्याची शक्यता असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.