मुंबईः 2019 मध्ये MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. या बॅचमध्ये उत्तीर्ण 413 विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. तसेच येत्या वर्षात 17 जानेवारीपासून या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे 2022 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खरोखरच आनंदवार्ता घेऊन आले आहे, असेच म्हणावे लागेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाल्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. 28 सप्टेंबर 2021 रोजी या 2019 मधील परीक्षेचा सुधारीत निकाल जाहीर करण्यात आला होता. यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा 413 पदांचा समावेश आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या थंड कारभारावर ताशेरे ओढले होते. राज्यात असंख्य प्रश्न प्रलंबित असताना केवळ राजकीय शेरेबाजीवर भर दिला जातोय. अनेक विभागांतील भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. राज्यात एवढे गंभीर प्रश्न असताना सरकार काहीही निर्णय घेत नाही, यामुळे राज्य सरकार हरवलंय, अशा शब्दात टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने MPSC च्या 2019 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसंबंधीचा निर्णय घेतल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
इतर बातम्या-