लालपरीत येणार अॅंड्रॉईड तिकीट मशिन, प्रवाशांना होणार हा फायदा, परंतू मशिन ठेवायला जागेची शोधाशोध
एसटी महामंडळाच्या नव्या अॅंड्रॉईड तिकीट प्रणालीमधून वाहकांद्वारे प्रवाशांना विविध पर्यायांमधून तिकीटांचे पेमेंट करण्याची सुविधा आहे, परंतू या मशिनच्या चार्जिंग करण्यासाठी एसटीच्या आगारामध्ये कोरड्या आणि आगरोधक जागेची शोधाशोध सुरू आहे.

मुंबई : एसटी महामंडळाने ( Msrtc ) आता कात टाकायला सुरुवात केली आहे. एसटी महामंडळात ( Electric Tickets Machin ) आता नविन ई- तिकीट मशिन येत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कंडक्टरांच्या हाती आधुनिक अॅंड्रॉईड ई-तिकीट मशिन असल्याने त्यांच्या व्यवहार सुटसुटीत होणार आहे. प्रवाशांचे कंडक्टरशी ( St Conductor ) सुट्ट्या पैशांवरुन नेहमी होणारे वादविवाद मिटणार आहेत. तसेच या मशिनवर प्रवाशांना तिकीटासाठी विविध पर्याय मिळणार आहेत. त्यामुळे कंडक्टरांसोबत प्रवाशांचा देखील फायदाच होणार आहे.
एसटी महामंडळाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या अँड्रॉइड प्रणालीवर आधारीत नविन ईटीआयएम तिकीट मशिन पुरविण्यासाठी निविदा काढली होती. तसेच नविन प्रणालीमधून वाहकांद्वारे प्रवाशांना विविध पर्यायांमधून तिकीटांचे पेमेंट करण्याची सुविधा आहे. एसटी महामंडळात आधी ट्रायमॅक्स कंपनीच्या मशिन होत्या. महामंडळाच्या आधीच्या ई-तिकीटींग मशिनचा अनुभव चांगला नसल्याने आता नवीन टेंडर मंजूर झाले आहे.
मशिन वारंवार नादुरूस्त होत होत्या
राज्य परिवहन महामंडळात नवीन अॅंड्रॉईड तिकीट कार्यप्रणाली लवकरच कार्यान्वित होणार आहे. या नव्या ई- तिकीट मशिन एड्रॉईड सॉफ्टवेअरवर काम करणाऱ्या असल्याने त्यांचा फायदा एसटी प्रशासनाला तसेच प्रवाशांना देखील होणार आहे. यात प्रत्येक कंडक्टरांच्या हाती ईटीआयएम मशिन देण्यात येणार आहेत. या मशिन आधुनिक असल्याने ई-तिकीट काढण्याबरोबरच त्यात प्रवाशांना तिकीटाचे विविध पर्याय मिळणार आहेत. आधीच्या ईटीआयएम मशिन वारंवार नादुरूस्त होत होत्या. तसेच त्यांच्या बॅटरीही खराब होत होत्या. त्यामुळे नविन मशिन खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
मेसर्स ईबिक्स कॅशकडून व्यवस्था
मेसर्स ईबिक्स कॅश यांच्याकडून या मशिन ठेवण्यासाठी आणि चार्जिंगसाठी अतिरिक्त रॅक पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे यासाठी महामंडळाला कोरड्या आणि स्वच्छ जागेची गरज लागणार आहे. या मशिनचे रॅक ठेवण्यासाठी आगारातील रोकड आणि तिकीट शाखेतील अनावश्यक सामान हटवून नव्या मशिनच्या चार्जिंगची व्यवस्था करण्याचे आदेश एसटीच्या सर्व विभागांना महामंडळाचे महाव्यवस्थापक ( वाहतूक ) यांनी दिले आहेत.
शॉर्ट सर्कीटमुळे वारंवार आगी
अनेक आगारातील तिकीट व रोकड शाखेतील शॉर्ट सर्कीटमुळे वारंवार आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तिकीट व रोकड शाखेतील विद्युत यंत्रणा वेळीच दुरुस्त करण्यात यावी. विद्युत कार्यप्रणाली बंद पडल्या संगणकीय यंत्रणा सुरु राहण्यासाठी युपीएसचा पुरवठा होणा आहे. त्यामुळे युपीएस ठेवण्यासाठी योग्य जागेची निवड करण्याचे फर्मान निघाले आहे.