एसटीच्या अधिकृत थांब्यावर 30 रुपयांत नाश्ता न मिळाल्यास कारवाई, महामंडळाने काढले आदेश
अलीकडेच एसटीच्या नाशिक रोड स्थानकात नाथजल हे बाटलीबंद पाणी छापिल किंमतीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याची तक्रारी आल्या होत्या. तसेच एसटी अधिकृत थांब्यावरील 30 रुपयांतील नाश्ता योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी महामंडळाने पत्रक काढले आहे.

मुंबई : एसटीने प्रवास करत असताना जेवणासाठी बस ज्या हॉटेलवर स्टॉप घेते तिथे प्रवाशांना तिकीट दाखवून 30 रुपयांमध्ये नाश्ता मिळतो. गेली अनेक वर्षे ही योजना अस्तित्वात आहे. सध्या उन्हाळी हंगाम आणि सुट्ट्यांचे दिवस असल्याने एसटीच्या गाड्यांना गर्दी असताना एसटीच्या अधिकृत थांब्यांवरील हॉटेलात 30 रुपयांत नाश्त्याच्या बाबतीत तसेच बाटली बंद पाणी ‘नाथजल’ छापील किंमतीपेक्षा जादा दराने विकल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने अशा प्रकरणात वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी निश्चित करीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेस करीता मंजूर केलेल्या खाजगी थांब्यांवर हॉटेल मालकाने 30 रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता देणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तरीही काही हॉटेल चालक या आदेशाचे पालन करीत नाहीत अशा तक्रारी समाजमाध्यमावर आल्या आहेत. तसेच नाथजल हे बाटली बंद पाणी देखील कुलींग चार्जच्या नावाखाली छापिल दरापेक्षा अधिक दराने विकले जात असल्याच्या तक्रारी समाजमाध्यमावर येत आहेत. अलीकडेच नाशिक रोड स्थानकात नाथजल हे बाटलीबंद पाणी कुलींग चार्जच्या नावाखाली छापिल किंमतीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याची तक्रार समाजमाध्यमावर एका प्रवाशाने व्हिडीओ काढून केली होती.
वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापक जबाबदार
या अनुषंगाने मार्ग तपासणी पथकांनी, वाणिज्य आस्थापना पर्यवेक्षक आणि विभागातील अधिकाऱ्यांनी 30 रुपयातील नाश्ता दिला जात आहे का? आणि जादा दराने नाथजल विक्री होत असेल तर खातरजमा करावी. तसेच योजनेची अंमलबजावणी होत नसेल तर हॉटेल मालकाच्या ही बाब निर्दशनास आणून द्यावी, तसेच अधिकृत थांबा ज्या विभागाच्या अखत्यारीत येतो त्या विभाग नियंत्रकास लेखी अहवाल सादर करावा, तसेच कारवाई करण्यात हयगय आढळल्यास बस स्थानकावरील वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करावी असे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक ( नियोजन आणि पणन ) यांनी पत्रक काढून दिले आहेत