श्रावणात एसटी तिर्थस्थळांचे दर्शन घडविणार, प्रत्येक आगारातून धार्मिक सहलींचे आयोजन
राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून श्रावण महिन्याच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले आहे, मोफत आणि माफक दरात या सहली होणार आहेत.
मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : एसटी महामंडळाच्यावतीने श्रावण महिन्याच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना विविध तिर्थस्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. या उपक्रमास श्रावणात एसटी संगे तीर्थाटन असे नाव देण्यात आले आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत तसेच माफक दरात धार्मिक पर्यटन घडविण्याची योजना आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचे व्रत अधिक जोमाने सुरु ठेवावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून श्रावण महिन्याच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले आहे. एसटीचे राज्यात सुमारे 250 आगार आहेत. त्यातून श्रावण महिन्यात एकदिवसीय किंवा एक रात्र मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या धार्मिक सहलीत सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. 75 वर्षे पूर्ण झालेल्या अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तसेच 12 वर्षांच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येते.
प्रवाशांची संख्या वाढली
या धार्मिक सहली गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत आहेत. या योजनेमुळ सर्वसामान्यांना माफक दरात धार्मिक पर्यटन करण्याचा आनंद मिळणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत देखील वाढ होण्यास मदत होणार आहे. गेल्यावर्षीपासून एसटी मंडळाने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.