आषाढी एकादशीसाठी एसटी सज्ज, श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी सोडणार 5000 विशेष बसेस
दरवर्षी शेतकरी बांधव पायी चालत पंढरीला निघतात. यात्रे आधी आणि नंतर परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळ दरवर्षी बसेसचे नियोजन करते. राज्याचे मुख्यमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर यात्रेच्या जादा वाहतूकीचा आढावा घेतला आहे.
मुंबई : पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥ आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा गजर करीत श्रीक्षेत्र पंढरपूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी तसेच त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने यंदा दरवर्षीप्रमाणे मोठी जय्यद तयारी केली आहे. कोरोना साथीनंतर दोन वर्षांनंतर गेल्यावर्षांपासून पंढरपूरची आषाढी एकादशीची यात्रा नियमित सुरू झाली आहे. यंदा या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे पाच हजार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. २५ जुन ते ०५ जुलै, २०२३ दरम्यान या विशेष बसेस धावणार आहेत. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहोळ्यासाठी ( २७ जुन रोजी ) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पंढरपूर यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, संभाजीनगर ( औरंगाबाद) , नागपूर, अमरावती या सहा विभागातून एसटी बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे- जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे. लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.
पंढरपूरची आषाढी वारी हा महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातीलही भाविकांसाठी भक्तीचा मेळा असतो. या सोहळ्यासाठी दरवर्षी शेतकरी बांधव पायी चालत पंढरीला निघतात. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ दरवर्षी नियोजन करीत असते. राज्याचे मुख्यमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर यात्रेच्या जादा वाहतूकीचा आढावा घेतला आहे. संभाजीनगर (औरंगाबाद ) मधून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
तात्पूर्ती चार बस स्थानके
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग ( आयटीआय कॉलेज ) व विठ्ठल कारखानायात्रा स्थानक अशी चार तात्पूर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.
यात्राकाळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी विविध सोयी-सुविधापुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
बसस्थानकांचे नियोजन पंढरपूर येथे यात्रेसाठी येणाऱ्या आणि जाणाऱ्या भाविकांसाठी पुढीलप्रमाणे जिल्हानिहाय बसेसचे आणि स्थानकाचे नियोजन करण्यात आले आहे.
बस स्थानकाचे नाव जिल्हानिहाय बसेस
१. चंद्रभागाबसस्थानक – मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग आणि पंढरपूर आगार
२. भिमा यात्रा देगाव – औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश
३. विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
४. पांडुरंगबसस्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग