भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको !
नवीन तिकीट दराप्रमाणे फुल तिकीट ११, २१, ३१, ४१, ५१, ६१, ७१, ८१, ९१ या पटीत विषम संख्येत होत आहे. त्यामुळे वरचे एक रुपये देताना वाद होत आहेत. प्रवाशांनी १०,१५,२५,५० रुपये दिले तर प्रवाशांकडे एक रुपया नसल्यास कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये मोठे वाद होत आहेत. त्यामुळे कंडक्टरच्या डोक्याला ताप होत आहे.

एसटी महामंडळाने २५ जानेवारी २०२५ पासून १५ टक्के भाडेवाढ केल्यानंतर गोंधळ उडाला आहे. ही भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत न करता एक रुपयांच्या पटीत केली गेली आहे. त्यामुळे वरचे एक रुपये सुटे देण्यावरुन कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये भांडणे सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील जनतेला तिकीट काढताना सुट्टे पैसे जवळ बाळगावे लागत आहेत. यावर समपटीत भाडेवाढ करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र ती देखील व्यवहार्य नसल्याचे उघड झाले होते. आता एसटी महामंडळाने परिपत्रक काढून सर्व आगार व्यवस्थापकांना सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात युपीआय वापरणाऱ्यांची संख्या कमी असल्याने कंडक्टर यातून कसे मार्ग काढतात याकडे लक्ष लागले आहे.
एसटी महामंडळाने शनिवार मध्यरात्री पासून १५ टक्के भाडेवाढ लागू केली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास महागला आहे. एसटीची नवीन भाडेवाढ पाचच्या पटीत न केल्याने प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात वाद होत आहेत. या संदर्भात वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशांवरुन होणारे वाद कमी करण्यासाठी उपाय सुचविण्याचे आवाहन महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केले होते. एसटीची भाडेवाढ विषम संख्येत आहे. या संदर्भात आता महामंडळाने पत्रक काढले आहे.
शंभर रुपयांची चिल्लर
भाडेवाढ विषम पटीत झाल्याने वाद वाढत चालले आहेत. यात एसटी भाडेवाढ २५ जानेवारी २०२५ रोजी लागु करण्यात आलेली भाडेवाढ ही १.०० रुपयाच्या पटीमध्ये करण्यात आली आहे. बऱ्याच ठिकाणी भाडेवाढीप्रमाणे प्रवाशांना उर्वरित सुट्टे पैसे प्रवाशांस देताना वाहक आणि प्रवासी याच्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेऊन वाहक आणि वाहतूक नियंत्रक यांना देण्यात येणारी रु. १०० / अग्रधनाची रक्कम ही सुट्या नाण्यांमध्येच देण्यात यावी असा पर्याय पुढे आला आहे. जेणेकरुन प्रवाशांचा परतावा देणे सुलभ होईल असे महामंडळाने म्हटले आहे. परंतू शंभर रुपयांची चिल्लर बाळगून कंडक्टरांना ताप होणार आहे. तसेच ग्रामीण भागात युपीआयने तिकीट काढणारे खूपच कमी असल्याने देखील गोंधळात भर पडणार आहे.




महामंडळाची बिकट अवस्था
एसटी महामंडळाला कोरोना काळापूर्वी दररोज २२ कोटीचे उत्पन्न मिळत होते. मात्र कोरोनाकाळात बस खरेदी रखडल्याने एसटीकडे असलेला १८ हजार गाड्यांचा ताफा आता केवळ १६ हजारावर आला आहे. त्यातच एसटी महामंडळाला मिळणाऱ्या गाड्यांचे कंत्राट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्दबातल केले आहे. त्यामुळे एसटीकडे आता सध्या गाड्यांची टंचाई आहे. अनेक मार्गांवर एसटीच्या सेवा बंद झाल्या आहेत. महिलांना अर्धे तिकीट तसेच ७५ वर्षांच्यावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास या योजनांमुळे एकीकडे गर्दी वाढली असताना आता महामंडळाकडे गाड्या नसल्याने एसटी महामंडळाची अवस्था बिकट झाली आहे.