एसटी खाजगी बसेसच्या लुटीला चाप लावणार, लवकरच ही नविन सेवा सुरु करणार
एसटीच्या महिलांसाठी निम्म्या तिकीटात प्रवास आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत प्रवास योजनेमुळे एसटीचे प्रवासी वाढले आहेत. आता एसटीच्या उत्पन्नात वाढ होत असून लवकरच महामंडळ स्वावलंबी होईल असे म्हटलं जात आहे.
मुंबई : महामंडळाने आता कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने ( Msrtc ) आता खाजगी बसेसच्या लुटीला चाप लावण्यासाठी कंबर कसली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता नवीन संपूर्ण शयनयान श्रेणीची ( St Sleeper Coach ) बस दाखल होणार आहे. या बसेसमुळे प्रवाशांना आता आरामात झोपून प्रवास करता येणार असून खाजगी स्लिपर कोचच्या वसुलीला लगाम बसणार आहे. एसटी महामंडळाच्या ( ST ) ताफ्यात लवकरच या आरामदायी फुल्ली शयनयान बसेस दाखल होणार आहेत.
एसटीच्या महिलांसाठी निम्म्या तिकीटात प्रवास आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत प्रवास योजनेमुळे एसटीचे प्रवासी वाढले आहेत. यामुळे राज्य सरकारकडून याबदल्यात प्रतीपूर्तीची रक्कम दिली जात असल्याने एसटीचा फायदा होत आहे. त्यात आता एसटी महामंडळाने आपली शयनयान स्लिपर कोच सेवा पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आरामात झोपून प्रवास करता येणार आहे. खाजगी स्लिपर कोचला त्यामुळे मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.
30 प्रवासी क्षमतेच्या स्लिपर कोच
एसटीच्या दापोडी कारखान्यात पन्नास स्लिपर कोचच्या बसेसची बांधणी सुरु करण्यात येणार आहे. एसटीने अलिकडे शयनयान कम आसनांच्या स्लिपर कोच बसेस सेवेत आणल्या होत्या. आता संपूर्ण शंभर टक्के शयनयान ( स्लिपर ) बसेसची निर्मिती करण्यात येणार आहे. या स्लिपर कोच बसेसमध्ये 30 प्रवासी क्षमतेच्या असणार आहेत. त्यांची बांधणी लवकरच सुरु होणार असून त्या 12 मीटरच्या असणार आहेत. या बसेसमुळे खाजगी लक्झरी कोचेसच्या अवाच्या सवा लुटीला लगाम लागणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
एकूण 22 हजार बसेसची गरज
एसटी महामंडळात पूर्वी 18 हजार बसेसचा ताफा होता. मधल्या काळात नवीन बसेसची खरेदी रखडल्याने एसटीकडे आता केवळ 14 हजार बसेस आहेत. एसटी महामंडळ पाच हजार इलेक्ट्रीक बसेस तसेच एक हजार सीएनजी इंधनावरील बसेसची खरेदी करणार आहे. तसेच एलएनजी इंधनाच्या बसेससाठी देखील प्रयत्न सुरु आहे. एसटीला खरे तर आपल्या ताफ्यात 22 हजार बसेसची गरज असल्याची माहीती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.