प्रत्येकाला वाटतं मीच आजन्म मंत्री असावा, मग नव्यांनी काय करायचं?; आमदार चंद्रकांत पाटील यांचा संतप्त सवाल
मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते.
Chandrakant Patil on Chhagan Bhujbal : महाराष्ट्रातील राजकारणात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. त्यात समता परिषदेच्या मेळाव्यात लोकसभेपासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काय काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रमच उपस्थितांसमोर मांडला. फडणवीसांपासून ते राष्ट्रवादीतील सर्व नेते पटेल, तटकरे हे माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते. फडणवीसांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं भुजबळांना घ्या, पण अखेर नाव मंत्रीमंडळात आलंच नाही, असे म्हणत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला. आता यावर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट विधान केले. प्रत्येकाला वाटतं मीच आजन्म मंत्री असावा, मग नव्यांनी काय करायचं? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितीत केला.
“नवीन येणाऱ्या आमदारांनी सत्ता घ्यायची नाही का?”
“छगन भुजबळ यांची नाराजी हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की मी आजन्म मंत्री असावा मग नवीन येणाऱ्यांनी काय करायचं? यामुळे नवीन येणाऱ्या आमदारांनी सत्ता घ्यायची नाही का?” असा सवाल मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
“आजचा कार्यकर्ता हा उद्याचा राज्यकर्ता होईल हे जे म्हटलं जातं हे खोटं आहे का? त्यामुळे नवीन लोकांना देखील संधी देऊन त्यांचे व्हिजन त्यांच्या विकासाचा मुद्दा आहे, यावर काम झाले पाहिजे. ही सर्व समाजाची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना काय वाटतं हे मला माहित नाही. प्रत्येकाला असं वाटतंय की मी आजन्म मंत्री असावे. मग नवीन येणाऱ्यांनी काय करायचं”, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली.
छगन भुजबळांनी सांगितली पुढची रणनिती
दरम्यान छगन भुजबळ यांनी काल नाशिकच्या मेळाव्यात त्यांची पुढील रणनिती जाहीर केली. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसींचा कैवार घेत राज्यात आंदोलन करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी समतेचे चक्र उलट दिशेने नेणाऱ्यांनाच आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.