मुंबई : “कर्नाटकात जातीयवाद पसरवण्यात आला. देशात शांतता नव्हती, या मुद्यांवर आम्ही जोर दिला, कर्नाटकातल्या जनतेने काँग्रेसला भरघोस मतांनी निवडून दिलं. कर्नाटकात लाट होती, तीच लाट आता महाराष्ट्रात आहे. सिल्वर ओकवर शरद पवारांच्या नेतृत्वात बैठक झाली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झालीय” असं काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले.
“संजय राऊत हे 19 जागांबद्दल जरी बोलत असले, तरी देखील अजूनपर्यंत कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्ही सर्व नेते बसू आणि फॉर्म्युला ठरवू. मेरिटनुसार फॉर्म्युला ठरेल” असं नसीम खान यांनी स्पष्ट केलं. “सीट शेअरिंगसाठी किंवा जागा वाटपाबद्दल कुठलाही वाद महाविकास आघाडीत राहणार नाही. कॉमन मिनिमम अजेंडा तिथेही राबवू असा आमचा मानस आहे” असं नसीम खान यांनी सांगितलं.
पंतप्रधान, गृहमंत्री सगळे तिथे गेले काय झालं?
“भाजपाला सिंगल डिजिटमध्ये सुद्धा या राज्यात आम्हाला येऊ द्यायचं नाही हा आमचा मानस आहे. कर्नाटकात जेपी नड्डा, पंतप्रधान, गृहमंत्री सगळे गेले काय झालं? तेच महाराष्ट्रातही होईल. कर्नाटकात यांनी पोलरायझेशनचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. लोकं वैतागलेत. महागाई वाढतोय, भ्रष्टाचार वाढतोय, जनता त्रस्त आहे. बेरोजगारी वाढतेय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत” अशी टीका नसीम खान यांनी केली.
‘मुंबई काँग्रेसचा बेस’
“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. आमचे ज्येष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत, राहुल गांधी यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. मुंबई काँग्रेसचा बेस आहे 2009 मध्ये आमच्या पाच जागा राष्ट्रवादीची एक होती आणि पुन्हा एकदा आम्हीच येणार, महाराष्ट्रात काँग्रेसची जमीन ही मजबूत आहे” असं नसीम खान म्हणाले.