मुंबई | 05 जानेवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी देशातील विरोधक एकत्र आले. ‘इंडिया’ आघाडी झाली. या आघाडीच्या वरचेवर बैठका होत असतात. याच इंडिया आघाडीतील मित्र पक्षांच्या महाराष्ट्र्तील महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा होत असतानाच काँग्रेसने मात्र लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागांसाठीच्या इच्छुकांची यादी मागवली आहे. काँग्रेस नक्की स्वबळावर लढण्याची तयारी करतंय की आघाडीतील मित्रपक्षांवर दबाव टाकतंय? याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न विचारला जातोय.
काँग्रेसने लोकसभेच्या 48 जागांवर लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावं मागवली आहेत.काँग्रेसची स्वबळाची तयारी लढण्याची तयारी करतंय की ठाकरे गट आणि राष्ट्रवादीवर हे दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, अशी चर्चा होतेय. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचं सूत्र अद्याप अस्पष्ट आहे. तरी काँग्रेस स्वबळाच्या दिशेनं का? प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची नावं 10 जानेवारीपर्यंत मागवल्याची माहिती आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे मुख्यमंत्री व विधिमंडळ नेत्यांची गुरुवारी दिल्लीत बैठक झाली.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या बैठकीसाठी गेले होते. दिल्लीतील बैठकीनंतर सर्व जिल्हाध्यक्षांकडून महाराष्ट्रातील इच्छुकांची नावे 10 जानेवारीपर्यंत पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्षांकडून नावे मागवली आहेत.
आता काँग्रेसने संभाव्य उमेदवारांची यादी मागवली आहे म्हटल्यावर याचे पडसाद महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर उमटणारच. ठाकरे गटाच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादा पक्ष चाचपणी करत असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही. माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील 48 जागांची चाचणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस यादी मागवली असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस लढत असलेल्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात पोहोरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. उद्धव ठाकरेंनी शब्द दिल्याचा दावा महंत सुनील महाराज यांनी केला आहे. एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॅार्म्युला ठरला नसला तरिही, उबाठाने संभाव्य उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय सुनील महाराज यांनी प्रचारही सुरु केला आहे.