11वी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय, तर राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार – वर्षा गायकवाड
राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. तर 11वी प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विद्यार्थीहिताचा निर्णय होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
मुंबई: राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तर 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहे. त्या बैठकीत विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. 9वी ते 12वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत विचार केला जाईल, असं गायकवाड यांनी सांगितले आहे. (Education minister varsha Gaikwad on school and 11th admission process)
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. अशा पालकांना टप्प्या-टप्प्यात फी भरण्याची मुभाही देण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितले. तसंच जर विद्यार्थी फी भरु शकला नाही तर शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. एखाद्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास, अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.
11 प्रवेशाबाबत लवकरच निर्णय
तर मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने 11वी प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये सुरु होण्यास वेळ लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
शिक्षकांच्या उपस्थितीबाबत आदेश
शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश काढले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्वच शाळांमध्ये यापुढे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून 50 टक्के उपस्थिती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे निर्देश ऑनलाईन, ऑफलाईन, दूरस्थ शिक्षण पद्धतीसाठी लागू असणार आहेत.
संबंधित बातम्या:
…म्हणून शाळा इतक्यात सुरु होणार नाहीत : वर्षा गायकवाड
दहावी-बारावीची ATKT परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, वर्षा गायकवाड यांची माहिती
Education minister varsha Gaikwad on school and 11th admission process