रत्नागिरी- गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा हायवेवर (Mumbai Goa Highway)सुरु असलेले काम, रस्त्यांवर पडलेले खड्डे या सगळ्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav)कोकणात जाणाऱ्यांचं यंदाही अवघडच आहे, अशी चर्चा होती. मात्र अधिवेशनाच्या काळात सरकारच्या वतीने या हायवेवर सुरु असलेल्या कामाबाबत एक महत्त्वाची बैठक 22 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. त्या बैठकीत कोकणातील आमदार, खासदारांची उपस्थिती होती. या बैठकीत गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते आणि प्रशासनाला तसे आदेशही देण्यात आले होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)यांनी आज दिवसभर मुंबई-गोवा हायवेवर प्रत्यक्ष जात या कामाचा आढावा घेतला. त्यामुळे प्रशासनाची थोडी तारांबळही उडाली. अनेक ठिकाणी जलदगतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे तातडीने हाती घेण्यात आली कामांना गतीही मिळाली. कशेडी घाटाची पाहणी केल्यानंतर त्यानंतर रत्नागिरीत पोहचलेल्या रवींद्र चव्हाण यांनी काम प्रगतीपथावर असल्याची माहिती दिली.
एकनाथ शिंदे सरकार गतिमान पद्धतीने काम करत असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामाबाबत वारंवार अधिवेशनात विचारले जात होते, त्यानंतर 22ॲागस्टला बैठक घेण्यात आली, असे चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीत गणेशोत्सवाच्या आधी मुंबई गोवा हायवेवरील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले गेले. त्यासाठी 10 पेक्षा जास्त एजन्सी नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिका-यांना फिल्डवर जावून काम करुन घेण्याचे आदेश दिले होते, अशी माहितीही चव्हाम यांनी दिली. खड्डे बुजवण्याकरता नवीन पद्धतीन वापरल्या गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होईल याची तारीखच त्यांनी जाहीर केली.
23 डिसेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण तयार होईल, अशी तारीखच त्यांनी यावेळी जाहीर केली. कशेडी बोगद्याची पाहणी केलीये, एक लेन लवकरच सुरु होईल असेही चव्हाण म्हणाले. मुंबई-गोवा हायवेवर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत, न्यायालयाचे आदेश आहेत त्यामुळे काम बंद आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याबाबत लवकरच न्यायालयात योग्य भूमिका मांडून काम लवकर कसे सुरु होईल याकडे लक्ष देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. याचविषयी जेव्हा छगन भुजबळ हे बांधकाम मंत्री होते, तेव्हा निधी नाही अशी उत्तरे मिळत होती. पण केंद्रीय मंत्री नितिन गडकरींकडे जेव्हा राष्ट्रीय महामार्गाचे खाते आले तेव्हा कोकणातील रस्त्यांच्या कामाला गती आली आणि आज राष्ट्रीय महामार्ग सिमेंटचे झाले आहेत, याची आठवण त्यांनी करुन दिली.
दोन वर्षे करोनाचा काळ होता त्यामुळे या गोष्टीकरता विलंब झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. या कामात अडचण काहीच नाहीये, शासनाकडे पैसे आहेत. हा मार्ग लवकर व्हावा अशी नितीन गडकरी यांची मानसिकता आहे, असेही त्यांनी सांगितले. घाटात दरड कोसळू नये याकरता निरी नावाची संघटना काम करते आहे. समन्वयाने सर्वांनी काम करणे गरेजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाच्या काळात पर्यायी रस्त्यांबाबत शासनाने विचार केला आहे आणि त्याबाबत अधिकारी कामाला लागलेत, असेही त्यांनी सांगितले.