मुंबई | 27 जुलै 2023 : राज्यात आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसंच इतर भागातही जोरदार पाऊस होतोय. नागपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस होतोय. रत्नागिरीलाही पावसाने झोडपलं आहे. राज्यभरातील पावसाचा आढावा घेऊयात…
राज्यात आज कोकणातील काही भाग, घाटमाथा तसंच विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, तसंच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.
उर्वरित कोकण, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलाय.तर उर्वरित जिल्ह्यात आणि शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
कालपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग बंद आहे. सध्या खडकवासला धरणात 96 टक्के पाणीसाठा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी पत्रातील पाण्याचा पातळी वाढली आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर अती धोकादायक घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
संपूर्ण पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाची बॅटिंग जोरात सुरू आहे. पवना धरण 73. 59 टक्के भरलं आहे.असाच दमदार पाऊस मावळात सुरू राहिला तर काही दिवसांत पवना डॅम शंभर टक्के भरेल, असा अंदाज आहे.
सध्या पवनानगर परिसरात पाऊस चांगला पडत आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसह पिंपरी-चिंचवड आणि मावळवासियांना दिलासा मिळाला आहे.
यंदा मावळात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळासह आंबेमोहोर, कोलम, फुले समृद्धी या भाताचे वाणाची शेतात लागवड करण्यात आली आहे. यापैकी तेरा हजार पाचशे हेक्टरीवर 90 टक्के इंद्रायणी तांदुळाचे पीक घेण्याकडे कल मावळातील शेतकऱ्यांचा असतो. या तांदळासाठी पुण्याचं मार्केटयार्ड चं दालन विक्रीसाठी खुलं असते. कारण या इंद्रायणी भाताला पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मागणी आहे
कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी… अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून दीड लाख क्यूसेक वेगानेने पाणी सोडलं जाणार आहे. सध्या 1 लाख 25 हजार क्यूसेकने विसर्ग सुरु आहे अलमट्टी मधील विसर्ग 25 हजार क्यूसेकने वाढण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसंच हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होवू नये याकरीता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील पूरप्रवण गावांची -जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. 96 गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यामुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील संभाव्य पूरप्रवण गावांची पाहणी करण्यात आली आहे.