मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : अंतरवली सराटी दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने सांगितलं होतं की, आम्ही कोणालाही अटक करणार नाही. आमचे लोक अटक करून सरकारला आम्हाला बदनाम करायचं आहे. त्यांनी आमच्या विरोधात बोलणे बंद करावं. आम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात बोलणार नाही. सगळ्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आमचे आहेत. पूर्ण माहिती घेऊन त्यानंतर त्यावर बोलेन. सरकारने सांगतिले होते अटक करणार नाही म्हणून तुम्ही अटक करून आमच्या आंदोलनाला डाग लावणार आहेत का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात सरकारने आरोपींना कसं काय पकडलं?, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे.
अंतरवली सराटी दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही अटक केली आहे. काल सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास ही अटक केली. अंबड पोलीस ठाण्याच्या लोकअपमध्ये आरोपींचा मुक्काम आहे. अंबड पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. आज सकाळी 11 वाजता अंबड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करू नये. सरकारने गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता आमच्या लोकांना अटक का केली जात आहे?, असं सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. अजित पवार म्हणतात तसंच आम्हीही म्हणतो. पोलिसांनी दबावाला बळी पडूच नये. पोलीस प्रशासनाने त्यांचं काम केलंच पाहिजे पण निष्पाप लोकांवरही अन्याय होऊ नये, याकडेही त्यांनी लक्ष द्यावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
अंतरवली सराटी हल्ला प्रकरणात पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करावी. तपासातून वस्तुस्थिती समोर येईल आणि ज्यांच्या चूक असतील, त्यांना कडक शासन होईल, असं अजित पवार म्हणालेत.