अमरावतीत युती धर्म पाळला गेला नाही?; फडणवीसांच्या भेटीनंतर नवनीत राणा म्हणाल्या, याची आयुष्यभर खंत…
Navneet Rana on Amravati Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यानंतर नवनीत राणा यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. वाचा सविस्तर...
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा दारूण पराभव झाला. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. अमरावतीत महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं. मी त्याच्यावर काहीच भाष्य करणार नाही. माझे जे नेते आहेत ते त्याच्यावर भाष्य करतील. मी माझं कर्तव्य इमानदारीने पार पाडलं. मी नरेंद्र मोदीजींना अमरावतीमधून जागा देऊ शकली नाही, ती आयुष्यभर खंत माझ्या मनात राहणार आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा?
लोकसभा झाल्यानंतर आम्ही भेटलो नव्हतो. कशाप्रकारे निवडणूक झाल्या त्या संदर्भात बोलणं झालं. आमची भेट झाली नव्हती म्हणून भेटायला आलो. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. मला असं वाटतं मी भाजपची कार्यकर्ता आहे. माझं कर्तव्य आहे की निवडणुकीत काय झालं ते माझ्या नेत्याला सांगणं. इलेक्शनमध्ये कश्यामुळे माझ्या जनतेने मला अमरावतीमध्ये थांबवलं, ते त्यांना सांगणं मला खूप आवश्यक होतं. कुठे काय झालं माझ्याकडून काय चूक झाली. 2024 मध्ये मला माझ्या जनतेने थांबवलं. या सर्व गोष्टींवर चर्चा झाली. देवेंद्र फडवणीस माझे नेते आहेत. त्यांच्यासोबत भेटून बरं वाटलं. निवडणुकीनंतर 23 दिवसांनी मी त्यांना भेटले, असं नवनीत राणा म्हणाल्या.
बच्चू कडू यांच्याबाबत काय म्हणाल्या?
लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेवर नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मला असं वाटतंय मी कोणावर काही बोलणार नाही. मी माझं काम जनतेसाठी करते कोणत्या नेत्यासाठी करत नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये जे काही घडलं माझं इलेक्शन मी लोकांच्या भरोशावर लढली. मी दुसऱ्या कोणाच्या भरोशावर निवडणूक लढली नाही. माझे नेते अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी माझ्यासोबत होते. ते सर्व जनतेला माहिती आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.
मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. पुढची जी काम करण्याची पद्धत असेल आणि विधानसभा मध्ये कसं काम करायचं आहे. या सर्व गोष्टींची चर्चा झाली. पार्टीचा जेव्हा पट्टा गळ्यात घातला त्याच्यासोबत नक्कीच मी इमानदार राहणार आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.